Story for kids: श्रावण बाळाची गोष्ट

Stotra (स्तोत्र)

नमस्कार मित्रांनो, आज आपण गोष्ट ऐकणार आहे ती श्रावण बाळाची.

श्रावण नावाचा एक मुलगा होता. त्याचे आई-वडील अंध होते. आई-वडील आंधळे असल्यामुळे श्रावण बाळाचं लहानपण अगदी कठीण गेलं. श्रावण बाळ लहानपणापासूनच खूप हुशार होता तो आपल्या आई-वडिलांचा खूप आदर करायचा आणि काळजी घ्यायचा. सकाळी लवकर उठून आई-वडिलांना आंघोळीसाठी पाणी आणत असे. तसेच त्यांच्यासाठी रोज जेवायला बनवत असे. श्रावण बाळ आई-वडिलांची खूप काळजी घ्यायचा.

श्रावणाच्या आई वडील देवाचे भक्त होते. नित्यनेमाने देवाची पूजा करत असे. श्रावण बाळ नेहमी त्यांना पूजेसाठी फुले आणून देत असे. एके दिवशी श्रावण बाळ आपल्या आई-वडिलांसोबत बसला होता. तेव्हा त्याचे आई-वडील श्रावण बाळाला म्हणाले, “बाळ तू आमची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो, आमची काळजी घेतो. आता आमची एकच इच्छा आहे, ती तू पूर्ण कर. आता आम्ही म्हातारे झालो आहोत आणि या जगातून जाण्यापूर्वी आम्हाला तीर्थयात्रेला जायचे आहे. देवाचा आश्रय घेतल्याने आत्माला शांती मिळेल.”

आई-वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रावण बाळाने दोन मोठ्या टोपल्या आणल्या आणि त्यापासून एक कावड तयार केली. त्या कावडीमध्ये श्रावण बाळाने आपल्या आई-वडिलांना बसवले. कावड खांद्यावर घेऊन तो तीर्थयात्रेला निघाला. जाता जाता रस्त्याने जे काही दिसेल तो ते आपल्या आई-वडिलांना सांगत असे. असे करता करता तो अयोध्या जवळ पोहोचला.

आता श्रावणाच्या आई-वडिलांना खूप तहान लागली होती. ते म्हणाले, “बाळा आम्हाला खूप तहान लागली आहे.” श्रावण बाळाने आई-वडिलांची कावड खाली ठेवली आणि त्यांना सांगितले तुम्ही इथे बसा मी तुम्हाला पाणी घेऊन येतो.आई-वडिलांना असे बोलून श्रावण बाळ पाणी आणण्यासाठी नदीच्या किनारी गेला.जवळच एक नदी होती. नदीच्या आजूबाजूला एक जंगल होते.

श्रावण बाळ जिथे त्याच्या आई-वडिलांना पाणी आणायला गेला होता, तिथेच अयोध्येचा राजा दशरथ शिकारीसाठी आला होता. दशवत राजा शिकारीसाठी एका झाडावर नेम लावून बसला होता. राजाला वाटले एखादा प्राणी पाणी प्यायला आल्यावर त्याचा आवाज होईल आणि मग आपण त्याची शिकार करू. पण काय तेवढ्यात श्रावण बाळ तिथे पोहोचला आणि आई-वडिलांसाठी पाणी घेत असताना पाण्याचा बुडबुड आवाज आला.

पाण्याचा आवाज आल्यावर राजाला वाटले की कोणीतरी जंगली प्राणी पाणी पीत असेल. त्याने आवाजाच्या दिशेने बाण सोडला. आणि त्याच क्षणी आवाज ऐकू आला. “आहा! मेलो. आई ग मेलो”. हे शब्द दशरथाच्या कानी पडले. दशरथ राजाला समजले आपला बाण एका माणसाला लागला आहे हे त्याच्या लक्षात आले. लगेच तो त्या आवाजाच्या दिशेने निघाला नदीजवळ आल्यावर बघतो तर काय त्या माणसाच्या छातीत बाण घुसल्यामुळे रक्त येत होतं.

राजा पटकन त्याच्याजवळ गेला आणि छाती मधून बाण काढला आणि म्हणाला, मी अयोद्धाचा राजा दशरथ आहे. दशरथ राजाने श्रावण बाळाला विचारले, “तू कोण आहेस? मला माफ कर.. माझ्या हातून चुकून तुला बाण लागला गेला. इथे कोणी माणसे असतील याची मला कल्पना नव्हती. या चुकीचा पश्चात्ताप करण्यासाठी मी काय करावे जेणेकरून तू मला क्षमा करशील?”

श्रावण बाळाने कण्हत कण्हत राजाला प्रणाम केला आणि म्हणाला, मी श्रावण माझ्या आई-वडिलांना मी तीर्थयात्रेला घेऊन चाललो होतो. माझे आई-वडील अंध आहे. ते इथून थोड्या अंतरावर बसले आहे. त्यांना खूप तहान लागली आहे. कृपया हे पाणी त्यांना नेऊन द्याल का? आणि माझ्याबद्दल त्यांना काहीही सांगू नका. श्रावणाचे बोलणे ऐकून राजाचे अंतकरण भरून आले. राजाने मान फिरवून हो म्हणाल्या बरोबर श्रावणाने प्राण सोडला.

कमांडलूमध्ये पाणी घेऊन राजा दशरथ ज्या ठिकाणी श्रावणाचे आई-वडील बसले होते त्या ठिकाणी गेला तेव्हा त्यांनी आश्चर्याने विचारले, “तू कोण आहे? तू आमचा श्रावण बाळ नाहीस. आमचा श्रावणबाळ कुठे आहे?, तो का आला नाही?, राजा दशरथ काहीही बोलले नाही. राजाने पाणी दिले पण श्रावण बाळाच्या आई वडिलांनी ते न घेता परत विचारले “तू कोण आहे आणि आमचा श्रावण बाळ कुठे आहे? आम्हाला सांगत का नाहीस?” श्रावणाच्या आई-वडिलांना बघून राजाच्या तोंडातून एकही शब्द फुटेना.राजाला बोलण्याचा धीरच होईना.

राजा दशरथ म्हणाला, “मला माफ करा. मी शिकार करत असताना, जो बाण मी सोडला, तो तुमच्या मुलाला श्रावण बाळाला लागला. त्याने मला तुमच्याबद्दल सांगितल्यामुळे, मी तुम्हाला इथे पाणी घेऊन आलो.” असे बोलून राजा दशरथ शांत झाले. राजा दशरथाचे शब्द ऐकून श्रावण बाळाचे आई-वडील जोरजोरात रडू लागले.

आपल्या मुलाचा मृत्यू झाल्यामुळे त्यांना खूप वेदना होत होत्या. त्यांनी राजा दशरथाच्या आणलेल्या पाण्याला स्पर्शही केला नाही. नंतर, श्रावण बाळाच्या आई-वडिलांनी रडत रडत राजा दशरथाला शाप दिला की, “तुला तुझ्या पुत्र वियोगामुळे मृत्यू येईल” राजा दशरथाला त्याच्या मुलापासून वेगळे होण्याचा शाप दिला. श्रावण बाळाच्या आईवडिलांना देखील मुलाचा वियोग सहन झाला नाही. त्यांनी रडत रडत आपले प्राण त्यागले.

पुरातन गोष्टी आपल्याला असं सांगतात की श्रावणबाळाच्या आई-वडिलांच्या शापामुळे राजा दशरथाला त्यांचा मुलगा श्रीरामपासून दूर राहावे लागले. राजा दशरथाच्या या शापाची पूर्तता करण्यासाठी, भगवान श्रीरामांना 14 वर्षांचा वनवास भोगावा लागला, त्याचे कारण राजा दशरथची पत्नी कैकेयी होती. श्रावणबाळाच्या आईवडिलांप्रमाणे, राजा दशरथ देखील आपल्या मुलापासून वेगळे होणे सहन करू शकले नाही आणि त्यांनी देखील श्रीराम वनवासात गेल्यानंतर आपले प्राण सोडले.