श्री वैभवलक्ष्मी व्रत म्हणजे काय?
तुमचे जीवन सर्वार्थाने सुखी व समृध्द करणारे व्रत म्हणजेच वैभव लक्ष्मीचे व्रत. हे व्रत म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचे साधन आहे. वैभवलक्ष्मी व्रत हे देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी केले जाणारे एक पवित्र व्रत आहे. हे व्रत सामान्यतः 11 किंवा 21 सलग शुक्रवारी केले जाते. अनेक स्त्रिया आणि भक्त या व्रताचे पालन आपल्या जीवनातील एखादी खास इच्छा पूर्ण व्हावी, आर्थिक स्थिती सुधारावी किंवा कुटुंबात सुख-शांती नांदावी या हेतूने करतात. व्रताचे शेवटचे (11वे किंवा 21वे) शुक्रवारी “उद्यापन”करून व्रताची सांगता केली जाते.कुठल्याही 11 किंवा 21 सलग शुक्रवारी हे व्रत श्रध्दापूर्वक केल्यास आपल्या जीवनांत सुख-समृध्दी नांदू लागेल, सर्व प्रापंचिक अडचणी दूर होतील. कोर्ट कचेऱ्यांची कामे मनासारखे निकाल लागून पूर्ण होतील. जीवन खऱ्या अर्थाने संपन्न होईल. लक्ष्मी ही सर्व मनोरथांची साधिका असल्याने तिच्यामुळेच आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हे व्रत मनोभावे केल्याने त्याचा अनेकांना फायदा झाला आहे. अशा प्रभावी व्रताची संपूर्ण माहिती देणारा हा लेख आहे.
श्री वैभवलक्ष्मी व्रतासंबंधीचे नियम कोणते आहे?
- हे व्रत करणाऱ्याने लक्ष्मीमातेवर पूर्ण श्रध्दा ठेवून व्रतास सुरवात करावी.
- सौभाग्यवती स्त्रिया किंवा कुमारिकांनी हे व्रत करावे. तसे पुरूषांनी हे व्रत केले तरी त्याचे उत्तम फळ मिळते.
- हे व्रत अकरा किंवा एकवीस शुक्रवार करावे व शेवटच्या दिवशी त्याचे शास्त्रोक्त पध्दतीने उद्यापन करावे.
- एकदा व्रत पूर्ण झाल्यावर परत करावयाचे असल्यास पुन्हा संकल्प सोडावा.
- व्रतास सुरवात करण्यापूर्वी या पुस्तकातील आठही लक्ष्मीच्या फोटोंना नमस्कार करावा. तसेच ‘श्री यंत्रा’ लाही नमस्कार करावा.
- एखाद्या शुक्रवारीच काही अडचण आल्यास त्या शुक्रवारी व्रत करावे पण मोजू नये. त्याच्या पुढल्या शुक्रवारी परत व्रत करावे.
- व्रताच्या दिवशी जास्तीत जास्त ‘जयलक्ष्मी माता’ असा जप करावा.
पूजेचे साहित्य
- देवपुजेसाठी शुध्द पाण्याने भरलेला तांब्या (कलश), श्रीयंत्रचित्र किंवा तांब्याचे श्रीयंत्र.
- शंख, घंटा, तेलवातीसह समई, निरांजन, तूपवातीसह
- पाण्याने भरलेला दुसरा तांब्या, ताम्हण, फुलपात्र पळी, वाटी व त्यात अक्षता व दागिना.
- उगाळलेले गंध, धुतलेल्या शुभ्र अक्षता, पांढरे शुभ्र कापड, चौकोनी रुमाल ५) बेल फुले, तुळशी पत्रे, मंजिरी, प्रामुख्याने तांबडी फुले.
- हळदकुंकू, शेंदुर, अष्टगंध, बुक्का फुलवाती, कापुर (आरती)
- विड्याची देठाची पाने, २ सुपाऱ्या, दुध, दही, मध, साखर, तूप
- जानवे, केळी, नारळ, आंबे (असल्यास) फळे
- शमी (असल्यास) आघाडा, पत्री, आभरणे ( दागिनी)
- कापसाची वस्त्रे, १ काडेपेटी
- गोड नैवेद्य
श्री वैभवलक्ष्मी व्रताच्या पूजेची मांडणी कशी करावी ?
आपले तोंड पुर्वेकडे करुन पाट अगर चौरंग मांडावा, आपणास बसावयास पोट अगर आसन / चटई घ्यावी. पाट पुसून त्यावर थोड्या तांदळाचे राशीचे वर्तुळ करावे. मधे किंचीत खोलगट त्यावर हळदकुंकूवाने स्वास्तिक काढावे व अष्टदिशांना हळदीकुंकूवाच्या उभ्या रेघा मारलेला जलपुर्ण कलश त्यावर ठेवावा. त्यात नाणे व सुपारी ठेवावी. त्या कलशावर आत पांढरे तांदुळ घातलेली वाटी ठेवावी. त्यात दागिना अगर रुपया ठेवावा. कलशाला टेकून, असल्यास तांब्याचे श्रीयंत्र, नसल्यास त्याचे चित्र (फ्रेम अथवा प्लॉस्टिक कागदात घालुन ठेवावा.) कलशाचे डावे बाजुस घंटा, उजवे बाजुस शंख ठेवावा. पाटावर अगर चौरंगावर उजवे बाजुस थोडे तांदुळ ठेवून त्यावर गणपती म्हणून सुपारी ठेवावी. सुपारीच्या डाव्या बाजुस दोन देठाची विड्याची पाने ठेवून त्यावर नाणे व सुपारी असा विडा ठेवावा. फुले, दुर्वा, सुगंधी द्रव्ये एका मोठ्या ताटात ठेवावी, पंचामृत तयार ठेवावे. समई योग्य ठिकाणी ठेवावी. धुप | उदबत्ती, नीरांजन, कर्पूर आरती तयार ठेवावी. चौरंगापुढे रांगोळी काढावी.
पुजा विधी
हे व्रत अगदी साधे व सोपे आहे. शक्यतो सुवासिनिंनीच करावयाचे आहे. याला उपवासाची अट नाही. दर शुक्रवारी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी पुजेस सुरवात करावी. पूर्वेकडे तोंड करून पाटावर बसावे. त्यावर मध्यभागी थोड्या तांदूळाची रास करावी. त्यावर एक तांब्याची लोटी पाणी भरून ठेवावी. लोटीवर एका वाटीत सोन्याचा कुठलाही एक दागिना ठेवावा. सोन्याचा नसल्यास चांदीचा ठेवावा. अथवा १ रू. चे नाणे ठेवले तरी चालते. त्यानंतर निरांजन व उद्बत्ती लावावी.
वैभवलक्ष्मी मातेचे व्रत करणाऱ्याने ‘श्री यंत्राचे’ व लक्ष्मीच्या अनेक रूपांचे जसे धन लक्ष्मी अथवा वैभव लक्ष्मी स्वरूप, श्री गजलक्ष्मी माता, श्री अधिलक्ष्मी माता, श्री विजयालक्ष्मी माता, श्री ऐश्वर्यलक्ष्मी माता, श्री वीरलक्ष्मी माता, श्री धान्यलक्ष्मी माता, श्री संतानलक्ष्मी मातायांचे अंत:करणपूर्वक दर्शन करावे.
त्यानंतर लक्ष्मीस्तवनाचा पाठ म्हणावा. नंतर वाटीतल्या दागिन्याची अथवा रूपयाची हळद, कुंकू, अक्षता वाहुन पूजा करावी. लाल रंगाची फुले वहावीत. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. खिरापत अथवा गोड पदार्थ प्रसादाला केला तरी चालेल. त्याचाही नैवेद्य दाखवून आरती करावी व मनोभावे ‘जय लक्ष्मीमातेचा’ अकरा, एकवीस, किंवा एकशे एक वेळा जप करावा. नंतर सर्वांना प्रसाद वाटावा. व पुजेची सांगता करावी. वाटीतील दागिना अथवा रूपया काढून घ्यावा. लोटीतील पाणी तुळशीत ओतावे. आणि पाटावरील तांदूळ एका ताटलीत पक्षांना घालावेत. म्हणजे वैभव लक्ष्मी व्रत पूर्ण झाले. असे अकरा किंवा एकवीस शुक्रवारी करावे.
तुम्ही म्हणाल अशा करण्याने काय होणार ? पण ते अनुभवल्याशिवाय कळणार नाही. केशराच्या एका लहानशा काडीने दुधाला रंग व स्वाद येतो की नाही ? तसेच या व्रताचे आहे. व्रत साधे, सोपे व लहान असले तरी याचे फळ महान आहे.
उद्यापनाच्या दिवशी शेवटच्या शुक्रवारी सात सुवासिनींना हळदी कुंकू द्यावे. खिरापत द्यावी व या पुस्तकाची एक एक प्रत भेट म्हणून द्यावी. आपल्यामुळे तेवढ्या जास्त भगिनी हे व्रत करतील व समाजात मानसिक शांती नांदेल.
श्री वैभव लक्ष्मी स्तवन श्लोक / लक्ष्मी स्तवन श्लोक
या रक्ताम्बुजवासिनी विलसिनी चंडांशु तेजस्विनी ।
या रक्ता रुधिराम्बरा हरिसखी या श्री मनोल्हासिनी ॥
या रत्नाकर मन्थनाप्रगटिता विष्णोस्वया गेहिनी ।
सा मां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्यावती ॥
श्री वैभवलक्ष्मीची कहाणी
एक आटपाट नगर होते. नगरात अनेक वाईट कृत्ये होत होती. दारू, सट्टा, जुगार, व्यभिचार, चोरी इत्यादी गोष्टींना अगदी ऊत आला होता. मग अशा लोकांच्या संगतीत चांगला माणूस बिघडला नाही तरच नवल. चारूशीला व तिचा पती या दोघांचाही संसार खरोखर आनंदात चालला होता. दोघेही गुण्यागोविंदाने नांदत होते. कुणाचीही चेष्टामस्करी ते करत नसत. किंवा कधी कुणाला नावही ठेवत नसत. आपण बरं आणि आपलं काम बरं. अशा तऱ्हेने ते रहात होते. कुणाच्याही अध्यात, मध्यात करत नव्हते. काम करून उरलेला वेळ ते ईश्वर भक्तित घालवित होते. त्या नगरात चारूशीला व तिचा पती यांचा संसार आदर्श मानला जायचा. पण त्यांच्या या सुखी संसाराला कुणाची तरी दृष्ट लागली.
चारुशीलाच्या पतीला वाईट लोकांबरोबर राहून वाईट संगत लागली. भरपूर पैसा मिळविण्यासाठी तो सट्टा, रेस, जुगार यांच्या नादी लागला. एका रात्रीत श्रीमंत करोडपती होण्याच्या नादात त्याने घरांत होते नव्हते ते सर्व गमावले. व त्याला आता खायची भ्रांत पडली. चारूशीला ही अत्यंत सोशिक व सुसंस्कारीत स्त्री होती. तिला पतीकडून अतिशय मानहानी सहन करावी लागत होती. आपल्या पतीच्या वागणूकीने ती अत्यंत दु:खी होत असे. पण ती मुकाट्याने सर्व सहन करीत होती. तिची परमेश्वरावर अतिशय श्रध्दा होती. एक ना एक दिवस आपला पती सुधारेल व आपला संसार सुखाचा होईल याची तिला खात्री होती. व याच भरवशावर ती आला दिवस घालवित होती.
एक दिवस भर दुपारी १२ वाजता तिच्या दरवाजात एक म्हातारी येवून उभी राहिली. म्हातारी असूनही तिच्या मुखावर विलक्षण तेज झळकत होते. तिच्याकडे पाहून चारुशीलाला अतिशय आनंद झाला व आपली आणि तिची फार पूर्वीची ओळख असल्यासारखे वाटू लागले. तिने तिला आदराने घरात नेले. व एका पाटावर बसविले. तिच्यापुढे गुळ, पाणी ठेवले व तिची विचारपुस केली.
म्हातारी तिला म्हणाली दर शुक्रवारी लक्ष्मी मातेच्या मंदीरात तू गाणं म्हणत होतीस ते मी ऐकत असे. परंतु आताशा तूं येत नाहीस म्हणून मुद्दाम मी चौकशी करण्यास आले की ही का येत नाही ? तेव्हा चारुशीलाने तिला सर्व हकीकत सांगितली. ती म्हणाली माते, आम्ही दोघं आमच्या संसारात अत्यंत सुखांत होतो. पतीला वाईट संगत लागली व घरात होते नव्हते ते सर्व गेले. व त्यामुळे आज आम्हांला या विपत्तित दिवस काढावे लागत आहेत. असे म्हणून ती हमसाहमशी रडूं लागली.
म्हातारीने तिचे सांत्वन केले, व म्हणाली, आता तुझ्या मागच्या जन्मीच्या कर्माचे भोग संपले आहेत. तुला मी आता ‘वैभव लक्ष्मी मातेचे व्रत’ सांगते. ते तूं कर म्हणजे गेलेले सर्व वैभव तुला परत मिळेल. चारुशीलाला अतिशय आनंद झाला. ती म्हणाली लक्ष्मी मातेचे व्रत मला सांगा. मी ते अवश्य करीन. म्हातारीने चारूशीलाला व्रताचा सर्व विधी सांगितला. ती म्हणाली, मुली हे व्रत अत्यंत साधे, सोपे व लवकर फळ देणारे आहे. यालाच ‘वैभवलक्ष्मी व्रत’ म्हणतात.
हे व्रत दर शुक्रवारी करावयाचे असते. व्रत करणाऱ्याने सकाळी स्नान करून धुतवस्त्र परिधान करावे. दिवसभरांत केंव्हाही ‘जय लक्ष्मी माता’ असा एक हजार वेळा जप करावा, कोणाची निंदा करू नये. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी हातपाय धुवून एक पाट मांडावा. व पुर्वेला तोंड करून बसावे. आपल्या समोर दुसरा एक पाट मांडून छोटी रास करावी. त्यावर तांब्याची लोटी पाणी भरून ठेवावी. त्यावर एक स्वच्छ रूमाल अंथरावा. रुमालावर तांदुळाची लोटीवर एका वाटीत सोन्याचा किंवा चांदीचा एक दागिना ठेवावा. (कुठलाही दागिना नसल्यास एक रूपयांचे नाणे सुध्दा चालेल.) नंतर निरांजन व उद्बत्ती लावावी. नंतर लक्ष्मीमाता ज्या यंत्राने संतुष्ट होते. त्या श्री यंत्राचे व लक्ष्मीच्या विविध स्वरूपांचे मनोभावे दर्शन घ्यावे. लक्ष्मीस्तवनाचा पाठ म्हणावा. नंतर वाटीत ठेवलेल्या दागिन्यावर किंवा रूपयावर हळद, कुंकू, अक्षता व लाल फुलं वाहून पुजा करावी. नंतर एखाद्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. नंतर लक्ष्मीमातेची आरती करावी. अकरा वेळा ‘जय लक्ष्मी माता’ असा जप करावा. व घरातील सर्वांना प्रसाद वाटावा. पुजा झाल्यावर वाटीतील दागिना, अथवा रूपया काढून घ्यावा. लोटीतील पाणी तुळशीत ओतावे. व तांदुळ गाईला, अथवा पक्षांना घालावेत.
या व्रताच्या प्रभावाने सर्व प्रकारची दुःख दूर होतात. भरपूर धनलाभ होतो. सौभाग्य स्त्रीचे सौभाग्य अखंड रहाते, संतान नसेल त्यांना मूल होते. कुमारिकांना योग्य पती मिळतो. हे ऐकल्यावर चारूशीला अत्यंत खूष झाली. तिने लगेच हे व्रत किती वेळा करावयाचे ? व उद्यापन कसे करावयाचे ते म्हातारीला विचारून घेतले.
म्हातारी म्हणाली हे व्रत अकरा किंवा एकवीस शुक्रवारी करावयाचे असते. जितके शुक्रवार करावयाचे असतील तितक्या शुक्रवारचा संकल्प सोडावा. शेवटच्या शुक्रवारी शास्त्रोक्त पुजा करून सात कुमारिका किंवा सात सुवासिनींना हळदी कुंकवाला बोलवावे. त्यांना खिरीचा प्रसाद द्यावा व हे वैभवलक्ष्मी पुस्तक प्रत्येकीला एक एक भेट द्यावे. व ‘लक्ष्मी माता’ समजून त्यांना नमस्कार करावा. व मनांत म्हणावे, “मी जे लक्ष्मी व्रत केले होते त्याचे आज उद्यापन करून व्रताची सांगता करत आहे. तेव्हा हे लक्ष्मी माते आम्हां सर्वांना सुखी कर.” असे म्हणून तिच्या फोटोला वंदन करून आशीर्वाद मागावा.
हे ऐकल्यावर चारुशीलाने डोळे मिटले व लगेच एकवीस शुक्रवारी व्रत करून शेवटच्या शुक्रवारी शास्त्रोक्त पध्दतीने उद्यापन करण्याचा संकल्प सोडला. तिने डोळे उघडले तेंव्हा म्हातारी अदृष्य झाली होती. समोर कोणीही नव्हते. तेंव्हा चारुशीला समजून चुकली की ती साक्षात लक्ष्मीमाताच होती. चारूशीलाला मार्ग दाखविण्यासाठी ती म्हातारीचे रूप घेवून आली होती.
दुसऱ्याच दिवशी शुक्रवार होता. म्हातारीने सांगितल्याप्रमाणे चारूशीलाने मनोभावे लक्ष्मी व्रताला प्रारंभ केला.
एक एक शुक्रवारी तिला ह्या व्रताचा प्रभाव जाणवू लागला. प्रसाद ग्रहण करण्यामुळे तिच्या पतीच्या स्वभावात फरक पडू लागला. त्याला त्याची चूक हळूहळू कळू लागली. त्याने वाईट संगत सोडून दिली व तो परत कामधंदा करू लागला. अपेक्षेच्या बाहेर त्याला धंद्यात नफा मिळू लागला. शेवटच्या शुक्रवार पर्यंत त्याने गहाण ठेवलेले सर्व दागिने सोडवून आणले. तो पुन्हा धार्मिक वृत्तीचा बनला. व घरांत पूर्वीप्रमाणेच सुखशांति नांदू लागली. शेवटच्या शुक्रवारी चारूशीलाने व्रताचे उद्यापन केले. सात सुवासिनींना हळदकुंकू देवून त्यांना या पुस्तकाची एक एक प्रत भेट दिली.
शेजारी पाजारी लोकांनी चारूशीलाला या व्रताचे मिळालेले फळ पाहून हे व्रत करण्यांस सुरवात केली व मातेची प्रार्थना केली की हे धनलक्ष्मी माते चारूशीलाला जसे तू फळ दिलेस तसे आमच्या सर्वांचे तू कल्याण कर.
विचारले जाणारे प्रश्न | Frequently Asked Questions (FAQ)
1. श्री वैभवलक्ष्मी व्रत म्हणजे काय?
श्री वैभवलक्ष्मी व्रत हे लक्ष्मी मातेच्या कृपेसाठी केले जाणारे एक पवित्र व्रत आहे. हे व्रत प्रामुख्याने अकरा (11) किंवा एकवीस (21) सलग शुक्रवार केले जाते, आणि शेवटी “उद्यापन” करून सांगता केली जाते.
2. हे व्रत कोण करू शकतो?
हे व्रत मुख्यतः सौभाग्यवती स्त्रिया व कुमारिका करतात. परंतु पुरुषांनी हे व्रत केल्यासही उत्तम फळ प्राप्त होते.
3. व्रताची सुरुवात कशी करावी?
व्रतास सुरुवात करण्यापूर्वी श्री यंत्र व लक्ष्मीच्या आठ रूपांचे दर्शन करून नमस्कार करावा. मनात श्रद्धेने संकल्प करून पहिल्या शुक्रवारी व्रत सुरू करावे.
4. व्रताच्या दिवशी कोणता जप करावा?
‘जय लक्ष्मी माता’ असा जप जास्तीत जास्त वेळा करावा. किमान ११, २१ किंवा १०८ वेळा जप करावा.
5. पूजेसाठी कोणती सामग्री आवश्यक आहे?
कलश, श्री यंत्र, शंख, घंटा, समई, अक्षता, फुले, दागिना किंवा नाणे, नैवेद्य, तूप, कापूर, हळद-कुंकू, पंचामृत इत्यादी पूजेसाठी आवश्यक आहेत. संपूर्ण सूची वरील लेखात दिली आहे.
6. व्रत पूर्ण न झाल्यास किंवा एखादा शुक्रवार चुकल्यास काय करावे?
एखादा शुक्रवार चुकल्यास त्या दिवशी व्रत करावे पण मोजू नये. पुढच्या शुक्रवारी व्रत पुन्हा सुरू करावे.
7. उद्यापन कसे करावे?
शेवटच्या शुक्रवारी सात सुवासिनींना किंवा कुमारिकांना हळदी-कुंकू देवून, खिरीचा प्रसाद व व्रताची पुस्तक भेट म्हणून द्यावी. त्यांना लक्ष्मी माता समजून नमस्कार करावा.
8. हे व्रत केल्याने काय लाभ होतो?
हे व्रत केल्याने आर्थिक स्थैर्य, सुख-शांती, पती-पत्नीमध्ये समजुत, संतानप्राप्ती, व्यवसायात यश, कोर्ट कचेऱ्यांमध्ये अनुकूल निकाल, व इतर अनेक गोष्टींमध्ये लाभ होतो. जीवन अधिक समृद्ध व सकारात्मक बनते.