Sankashti Chaturthi Vrat: संकष्टी चतुर्थीची माहिती, पूजाविधी आणि माहात्म्य

Blog

संकष्टी चतुर्थीचं व्रताची माहिती

प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असते. या दिवशी अनेक भक्त गणपतीची श्रद्धेने पूजा आणि उपवास करतात. या दिवशी उपवास करणाऱ्याने काळे तीळ पाण्यात टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी. मनात गणेशाचे स्मरण करून उपवास सुरू करावा. शक्य असल्यास “ॐ गं गणपतये नमः” या मंत्राचा जप करावा. उपवासासाठी योग्य असे अन्नच घ्यावे. रात्री पुन्हा आंघोळ करून पूजा करावी. एका पाटावर किंवा चौरंगावर तांदूळ किंवा गहू ठेवावेत. त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा. कलशाभोवती दोन वस्त्रे गुंडाळावीत. त्यावर ताम्हण ठेवून गणपतीची स्थापना करावी. गणपतीची पारंपरिक पद्धतीने (षोडशोपचार) पूजा करावी. पूजेसाठी लाल वस्त्र परिधान करावे आणि गणपतीला लाल फुल अर्पण करावे. नंतर गणपतीचे ध्यान करून, आपल्या मनोकामना आणि संकट निवारणासाठी प्रार्थना करावी. ‘संकष्टी चतुर्थीचे महात्म्य’ वाचावे. २१ मोदकांचा नैवेद्य दाखवावा. आरती करून साष्टांग नमस्कार घालावा. नंतर चंद्रदर्शन करावे. जर खरा चंद्र दिसला नाही, तर ताम्हणात किंवा पाटावर चंद्राची प्रतिमा काढून तिची पूजा करावी. चंद्राला गंध, फूल अर्पण करून “रोहिनाथाय नमः” असे म्हणत नमस्कार करावा. चंद्रदर्शनानंतर उपवास सोडावा. जेवणानंतर गणपतीची मूर्ती किंवा फोटो उचलून ठेवावा. पूजा झालेलं धान्य नंतर वापरात आणावे.हे व्रत श्रावण महिन्यात सुरू करून सलग २१ संकष्टीपर्यंत करावे आणि नंतर उद्यापन करावे. हे व्रत विशेषतः संकट दूर होण्यासाठी, मुलासाठी, इच्छित जोडीदार मिळवण्यासाठी किंवा इतर मनोकामनांसाठी केले जाते. शक्य असेल तर हे व्रत वर्षभर करावे.

संकष्टी चतुर्थी माहात्म्य

ॐ नमो गौरीनंदना । गणराया गजवंदना । विघ्नहर्ता भवभय हरणा । नमन माझें साष्टांगी ।। १।। नमूंया सरस्वतीस आतां। भगवती जगन्माता । विद्यादात्री विश्वमाता वीणाधारी ब्रह्मकन्या ।। २ ।। नमन माझें गुरूराया । सुखनिधान सद्गुरूवर्या । त्या पवित्र पदा स्मरूया । जाहली चित्तशुद्धी ।। ३ ।। ऋषीमुनी संतजन थोर । बुधगण सज्जन सादर । नमूं विनयें फार । ग्रंथाचेआरंभू कथन आतां ।।४।। महान संकष्ट चतुर्थीचे व्रत । देत फल त्वरित । सर्वदा तें आचरत । नरनारीजन श्रद्धाळून ।।५।। व्रत गणेशाचे हे । पुण्यदायी महान आहे । श्रद्धेनें आचरती हैं। होतें सकळ कल्याण ।।६।। शुभ कार्यारंभी पूजन गणेशाचें । सुखकर्त्या विघ्नहर्त्याचे सर्वश्रेष्ठ गजाननाचे। ही प्रथा अर्थपूर्ण ।।७।। ऋग्वेद गणेशाप्रती । गणानां त्वा गणपतिं । असें संबोधुनी नमिती वंदिती देवदेवताही ।। ८ ।। ” त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि” ऐसें म्हटले अथर्वशीर्षी । आपणही त्या गणपतीसी । मनोभावें वंदुया ।। ९ ।। शंकरांनी कांही दिवस पहिले । व्रत कृष्णचतुर्थीस केलें । व्रत झणी फळलें । झाला त्रिपूराचा नाश ।। १० । । मिळविण्या सिद्धिप्रत । षडाननानें केलें व्रत । सीताशुद्धीस्तव मारुतीनें हेंच केलें म्हणे व्रत ।। ११ ।। कृष्णाने शंबरासुरनाशासाठीं। गरुडानें अमृतप्राप्तीच्या सामर्थ्यासाठी। गौतमानें गंगाप्राप्तीसाठी । हें व्रत होतें पाळिलें ।। १२ ।। संकष्ट चतुर्थीचा व्रत प्रभाव । माहित झाला स्वर्गी जंव । भूवरी आला तव । आणि जाहलें प्रसिद्ध ।। १३ ।। याची कथा सुरस अती । श्रीकृष्ण धर्मास कथिती । वैशंपायनें जनमेजयाप्रती । स्कंदे ऋषींना सांगितली ।।१४।। व्रतकथा संकष्टचतुर्थीची । जाती सर्व व्यथा श्रवणपठणेची । ते आतां व्रत महात्म्याची । वर्णैया साचे आतां ।। १५ ।। राजा होता कृतवीर्य नांवाचा । लाभ नव्हता त्याला पुत्राचा । म्हणुनि एकदां पिता त्याचा । गेला ब्रह्मलोकीं ।। १६ ।। ब्रह्मदेवासी प्रार्थना केली । सांगितली विवंचना आपुली । मागें वर त्यालागी । मम पुत्रासी पुत्र द्यावा ।। १७।। ब्रह्मदेव म्हणाले तयाला । त्यानें शरण जावें गजाननाला । तो प्रसन्न होता तयाला । होईल सद्गुणी पुत्र ।।१८।। वद्य चतुर्थी कोणत्याही महिन्याची । तिला म्हणती संकष्ट चतुर्थीची । यथाविधी यथामती त्या दिनीची । पुजावा गणपती घरीं ।। १९।। संबंध दिवस करावें उपोषण । चंद्रोदयी गणेशपूजन जाण । चंद्रदर्शन घेऊनी करावें आपण । मग करावें पारणें ।। २० ।। जो व्रतपालन ऐसें करील । इच्छित पुत्र संतान होईल । इतरही मनोरथ पूर्ण होतील । लाभेल इच्छित ।। २१।। ऐकुनी ब्रह्मदेवाचा उपदेश । कृतवीर्यपिता आला सदनास । सर्व सांगुनी पुत्रास । व्रत करविलें त्याने ।। २२ ।। पुढील संकष्ट चतुर्थीसी । कृतवीर्य आचर व्रतासी करूनी उपोषणाशी । पतिपत्नी व्रत आचरती ।। २३ ।। चंद्रोदयाचे शुभवेळी । यथासांग पूजा केली । इच्छा मनींची सांगितली । गजानना नम्रभावें ।। २४ ।। मिष्ठान्न नैवेद्य अर्पण केला। चंद्रदर्शन लाभ घेतला । गंधाक्षता समर्पनी पूजला । नंतर केलें पारणें ।। २५ ।। एक वर्ष केलें व्रत । प्रसन्न झाला गिरजासुत । मग कृतवीर्याप्रत । जाहली पुत्रप्राप्ती ।। २६।। कार्तवीर्य त्याचें नांव । महापराक्रमी पूजे देव । नीतिमान न्यायी नम्रभाव । लाभली खंड कीर्ती ।। २७।। संकष्ट चतुर्थी सुरेख व्रत। जो हैं मनोभावानें आचरत । गणनायक त्यास पावत।

कथा आणखी एक ह्याची ऐका ।। २८।। सन्नजित नामे एक यादव । करी सूर्यभक्ति सदैव । त्या तपस्येनें सूर्यदेव । प्रसन्न जाहले तयाला ।। २९ । । त्यांनी मणी अलौकिक दिला । स्यमंतक नाम मण्याला प्रतिदिनी एक भोर त्याला । सोने तो देतसे ।। ३० ।। तेणें त्यासी मिळालें धन अपार । सहस्त्रभोजनें घाली फार । दीनदुबळ्यांना आधार । अन्नवस्त्र देतसे ।। ३१।। सन्नाजित एक सामान्य एैश्वर्य आणि धनधान्य । कोठून आलें म्हणती जन अन्य । चाले सर्वत्र चर्चा ।। ३२ ।। श्रीकृष्ण रहस्य जाणती । स्यमंतक मण्याचे हे खेळ असती । सत्राजिताला बोलावती । आणि म्हणती तयाला ।। ३३ ।। जैसा मृगाचा कस्तुरीमुळे । केळीचा लोंगरामुळें । शिंपल्यांतील किड्यांचा मोत्यांमुळे । होतसे प्राणनाश ।। ३४।। स्यमंतक मणी जाण तैसा । तुझ्या नाशास कारण असा । देऊन उग्रसेनास कसा । मोकळा हो तूं झडकरी ।। ३५ ।। त्यानें कृष्णाचें नाही ऐकलें । पुढें दिवस कांही लोटले । सन्नाजित बंधु प्रसन्न भले । कंठी मिरवीतसे मणी ।। ३६ ।। नंतर एकदां तो प्रसन्ने । कंठी स्यमंतकमणी घालोन । अरण्यांत गेला निघून । कराया मृगया किडा ।। ३७।। तेथें तो थकला अतिशय । विसावण्यासाठी वृक्षांखालीं जाय । हळूहळू अंधार होय । अंधार दाटे रात्रीचा ।। ३८ ।। पाहून मण्याच्या लख्ख प्रकाशाला। एक सिंह धावून आला । ठार मारून प्रसेनाला । पळाला घेऊनी मणी ।। ३९ ।। मार्गी असतां पळत । भेटला रामभक्त जांबुवंत । त्यानें सिंहाला मारत । पळविला स्यमंतक मणी ।। ४० ।। प्रसेन नाहीं आला परत इकडे । सन्नाजित शोकांत बुडे । कांहीना संशय वाटे तिकडे । कींह हे कृष्णाचेच कारस्थान ।।४१।। चोरीचा क्षुद्र आळ ऐकुनी । घननीळ दुःखी होऊनी । संगे प्रबळ लोक घेवोनी । निघाला स्यमंतक शोधा ।।४२।। मार्गी अरण्य लागलें तें । प्रसेनाचें कलेवर त्यातें । न्याहाळत सिंह अस्वल पावलांते निघाला पुढें पुढें ।। ४३ ।। पोंचला गुहेपाशी एका । इतरां ठेवुनी बाहेर ऐका । श्रीकृष्ण एकटा नेटका । शिरला त्या गुहेमाजी ।। ४४ ।। एका पाळण्याला मणी । जांबुवंतानें ठेवला होता बांधुनी। सूर्यासारखा प्रकाश झणी दिसला स्यमंतक मण्याचा ।। ४५ ।। कृष्णानें जाऊन हळूच । मणी काढोन घेतलाच । जांबुवंत धांवून आला तोंच । दोघांचे युद्ध जुंपलें ।।४६।। कांही दिवस गेले होवून । बाहेरचे थकले वाट पाहोन । अखेर गेले निराश होवून । परत आपुल्या द्वारकेला ।। ४७।। तों सर्वां कळला वृत्तांत । जनसमुदाय सकल हळहळत । कृष्णारे म्हणत । बुडाला शोकसागरीं । । ४८ ।। नंद आणि यशोदेसी। अपार दुःख झालें त्यासी । माझा कान्हा दाखवा मजसी । म्हणून हंबरडा फोडत ।। ४९।। आकाशवाणी झाली तोंच । दोघांनी संकष्टी चतुर्थीचे व्रत कराच । गणपतीची कृपा होतांच येईल सुखरूप श्रीकृष्ण ।। ५० ।। ते मग तैसेंच करती । संकष्टी चतुर्थीचे व्रत आचरती। गजानन प्रसन्न होती । आणि घडे नवल ।। ५१।। अठ्ठावीस दिवस युद्ध करूनी । जांबुवंत कृष्णसामर्थ्य। जाणोनी । मग श्रीकृष्णास संतोषुनी । अर्पे कन्या जांबुवंती ।। ५२ ।। स्यमंतक दिला आंदण म्हणून। श्रीकृष्ण बहु संतोषुन । द्वारकेस परतला जांबवंती घेऊन । आनंद झाला सर्वां ।। ५३ ।। मणी ज्याचा त्याला दिधला । चोरीचा आळ फोल ठरला । आनंदी आनंद जाहला । संकष्टीचतुर्थी व्रताकारणें ।। ५४ ।। पूर्वी गणेशचतुर्थीच्या दिनांत । चुकूनी गोपदांतील पाण्यांत । कृष्णानें चंद्र देखिला जलांत । म्हणुन आला खोटा आळ ।। ५५।। जी माणसें हें व्रत करिती । दूर देशी गेलेल्या व्यक्तिपरतती । खोटे आळ समस्त जाती । त्यासी होई निष्कलंक चारित्र्यप्राप्ती ।। ५६ ।।

संकष्टी चतुर्थी व्रताची । आणखी एक कथा साची । पठणें श्रवणें भाविकांची । मनें होतील प्रफुल्ल ।। ५७ ।। पूर्वी होती चंद्रावती नगरी । तेथें चंद्रसेन राजा राज्य करी। एक व्याघ त्याच नगरी। मृगया करीत रहात असे ।। ५८ ।। एके दिवशीं नित्याप्रमाणें । वनी गेला शिकार कारणें। अशक्य झालें शिकार मिळणें । कितीही प्रयत्न करूनही ।। ५९ ।। पशू नाहीं पक्षी नाहीं । व्याघ उपाशी राही । विचार किती करून पाही । काय करावें आतां ।। ६० ।। योगायोग विलक्षण खरा । कृष्ण चतुर्थी दिन तो सारा । वनदेवता भरभरा। जमून करीत होत्या पूजन ।। ६१ ।। व्याघ त्यांचे पाशीं गेला । हात जोडून विचारता झाला । पूजितां कोणत्या दैवताला । चंद्रोदय समयासी ।।६२।। देवी व्याधाला वदल्या । आम्ही पूजितों गणपतीला । संकष्ट चतुर्थी व्रताला । येथें नेमानें आचरितों ।। ६३ ।। करावें कैसे पूजन । सांगितले तेंही समजावून । व्याघाने लक्ष लावून । घेतलें ऐकून सर्वही ।। ६४।। काय फळ व्रत केल्याचें । तेंही वर्णिलें साचें। आचरण करावें व्रताचें । व्याधामनीं उपजे इच्छा । । ६५ ।। व्याधाने नम्र होत । देवींना केला प्रणिपात । त्याला आशिर्वाद देत । अंतर्धान पावल्या देवी ।। ६६ ।। पुढें व्याधानें उपोषण करूनी । संकष्ट चतुर्थी व्रत आचरूनी । मनोभावें गणेश पुजनी । प्रसन्न केलें गजाननाला ।। ६७।। जेव्हां जेव्हां जाई शिकारीस । शिकार मिळे विपुल त्यास । परंतु तेथल्या राजास । काहींच शिकार मिळेना ।। ६८ ।। व्याधाची किर्ती ऐकूनी । राजानें त्याला घेतलें बोलावुनी । आणि आपला मांडलिक म्हणूनी । केली त्याची योजना ।। ६९ ।। घेऊनी जाई अरण्यांत त्याला । शिकार मिळे अगणित राजाला । स्नेहभाव मनीं उपजला । त्यामुळेंच राजाच्या ।।७० ।। पुढें एका शुभदिवशीं । लग्न करूनी दिलें राजकन्येशी । दिल्या रत्न माणिकराशी । व्याध भोगी ऐश्वर्य ।। ७१ ।। पुढें तो वृद्ध झाला जरी । व्रतविधी नाहीं सोडला तरी । व्रत देऊनी पुत्रास अखेरी। झाला आपण निवृत्त ।।७२।। मद झाला पुत्राला तारुण्याचा विसर पडला त्यास व्रताचा । नाश झाला त्वरित ऐश्वर्याचा । जाहली अन्नान्नदशा ।। ७३ ।। होतें नव्हतें गेलें सर्व। मरण आलें संपलें आयुष्य पर्व। व्रत भंगले नडला गर्व । भारी कोपले गणपती ।। ७४ ।। पुण्य होतें पदरीं व्रताचें । म्हणूनी पुर्व जन्मींच्या व्याधाचे । नशिबी जन्म पोटीं राजाचे । मोठा वाढला ह्या जन्मीं ।। ७५ ।। देऊनी राज्य राजपुत्राला । गेला राजा तपश्चर्येला । तथापि त्या राजपुत्राला । नव्हतें स्मरण व्रताचें ।।७६।। त्याचा परिणाम म्हणुनी केलें कारस्थान त्याच्या बंधुनी। राज्यपद घेतलें हिरावुनी । हाकविला राज्या बाहेरी ।।७७।। अरण्यीं गेला जातां जातां । सरोवरकाठीं बैसला एकदां । अश्रू ढाळतां ढाळतां । बोल लावे आपल्या देवाला ।।७८।। एक मुनी तेथेंची चालले होते सहजची । दुःखी अवस्था राजपुत्राची। पाहतां थांबले क्षणभर ।। ७९ ।। राजपुत्राने त्यांचे चरण धरिले । सर्व दुःख निवेदन केलें । मुक्ति करावी विनवीलें । सर्व संकटातून ।। ८० ।। मुनी सूक्ष्म अंतर्ज्ञानी होते। त्यांनी जाणलें आपुल्या मनाते । एैसे भोग त्यासी कां तें । घडले व्रतभंगाचें पाप ।। ८१ ।। म्हणाले ते राजपुत्राला । शरणं जा तूं गजाननाला । करितां व्रत संकष्ट चतुर्थीला । होईल कल्याण तुझें ।। ८२ ।। पुढें मग त्या राजपुत्रानें । व्रत केलं नेमानें। पुनरूपि दशपटीनें । त्यास राजवैभव लाभलें ।। ८३ ।। भविष्योत्तर पुराणांतील कथा ही । वर्णिली आतां संक्षिप्तपणेंही। संतोष होवो गणेशभक्तांसही। जडो चित्त पारायणी ।। ८४ ।। संकष्ट चतुर्थीचे करून व्रत । देवासमोर निश्चल बसत। प्रार्थना करावी जोडोन हात । आणि मागावें वरदान ।। ८५ ।। श्री गणेशा तुं मातापिता । तूंच कर्ता आणि करविता । तूंचि दाता आणि त्राता । प्रत्यक्ष ब्रह्म तेंच तूं ।। ८६ ।। तूं आरंभ आणि अंत । तूंचि निर्मिले विश्व समस्त । ब्रह्मांडनायका तू अनंत । करावी दया मजवरी ।। ८७ ।। चिन्मया ब्रह्मया नमस्ते । ज्ञानविज्ञानमया नमस्ते । सच्चिदानंदा अद्वितीया नमस्ते । नमस्ते वाङ्मयरूपा ।। ८८ ।। कुटूंबिय सुखी असो सारी । लक्ष्मी सरस्वती वसो घरी । संकट व्याधींचे भय हारी । साकारो प्रत्यक्ष गणपती ।। ८९ ।। पार्वतीने हे व्रत केलें । रुष्ट शंकर परत आले । पूर्ववत संबंध झाले । ऐसें महात्म्य व्रताचें ।। ९० ।। माहात्म्य हें आपण वाचावें । किंवा श्रवण करावें। गणपतीस भजावें । होतील सर्व इच्छा पूर्ण । । ९१ ।

Read more: श्री गणेश अष्टोत्तर नामावलि, , श्री गणेश आरती – जय गणेश जय गणेश, जय गणेश , श्री गणेश चालीसा