Devshayani Ekadashi: 2025 मध्ये देवशयनी एकादशी कधी आहे?

Blog

देवशयनी एकादशी

प्रत्येक महिन्यात दोन पंधरवाडे असतात, ज्यांना शुक्लपक्ष आणि कृष्णपक्ष असे म्हणतात. या प्रत्येक पक्षातील अकराव्या तिथीला जो दिवस येतो त्याला एकादशी म्हणतात. वर्षभरात एकूण २४ एकादशी येतात, ज्यापैकी आषाढी आणि कार्तिक एकादशीला विशेष महत्त्व असते.

आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीला भगवान विष्णू झोपायला जातात मानले जाते, म्हणून त्याला ‘शयनी एकादशी’ म्हणतात. तर कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला भगवान विष्णू जागे होतात, ज्याला ‘प्रबोधिनी एकादशी’ असे म्हणतात. शयनी एकादशी ते प्रबोधनी एकादशी पर्यंत जो कालावधी असतो त्याला चातुर्मास असे म्हणतात. लोकांच्या समजुतीनुसार, सूर्य देव या काळात विश्रांतीसाठी गेलेले असतात.

आषाढ आणि कार्तिक महिन्यातील एकादशी विशेष महत्वाची मानतात.या दोन एकादशीच्या दिवशी लोक उपवास करतात आणि भगवान विष्णू व विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. आषाढी एकादशीला असंख्य भाविक वारीमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पायी जातात. एकादशी व्रताचे धार्मिक महत्त्व पुराणांमध्ये वर्णन केलेले आहे.

देवशयनी एकादशी कथा

देवशयनी एकादशी एक प्रसिद्ध कथा आहे. भक्त प्रल्हाद आणि त्यांच्या नातू मृदुमान्य यांच्याशी संबंधित आहे. मृदुमान्य राक्षसी वृत्तीचा असून त्याने भगवान शंकराला प्रसन्न करून वर मागितला की, त्याला एक स्त्री सोडून कोणीही मारू शकणार नाही. त्यानंतर तो अत्याचारी झाला आणि देवांनाही त्रास देऊ लागला. देवांनी त्याचा सामना करण्यासाठी ‘एकादशी’ नावाची तेजस्वी शक्ती निर्माण केली, तिने मृदुमान्याचा वध केला. साऱ्या जगाला त्याच्या त्रासापासुन सोडविले. तेव्हापासून एकादशीचे दिवशी भगवंताचे नामस्मरण, पूजा अर्चा करून उपवास करण्याची पध्दत रूढ झाली.त्यानंतर एकादशी व्रत करण्याची परंपरा सुरू झाली, ज्यामुळे भक्तांना झालेल्या पापापासून मुक्ती मिळते आणि भगवान विष्णूची कृपा लाभते.

एकादशी उपवास

एकादशीच्या दिवशी उपवास करण्याची परंपरा आहे. पण उपवासाचा खरा अर्थ आपण विसरलो आहोत. सध्या आपण त्या दिवशी खास खाण्याच्या पदार्थांवर ताव मारतो. म्हणूनच एक वाक्य लोकप्रिय झालं — “एकादशी अन दुप्पट खाशी.” पण उपवासाचा अर्थ आहे — ‘उप’ म्हणजे जवळ आणि ‘वास’ म्हणजे राहणे. म्हणजेच, त्या दिवशी आपण भगवंताच्या अधिक जवळ जाऊन त्याची सेवा, पूजन, नामस्मरण करणे — हे खरे उपवास.

विठ्ठल हे भगवान विष्णूंचेच रूप मानले जाते. त्यांचे सावळे, शांत आणि आकर्षक रूप मनाला प्रसन्न करते. त्यांच्या चेहऱ्यावर अपार प्रेम आणि करुणा ओसंडून वाहत असते. कमरेवर हात ठेवून ते अठ्ठावीस युगांपासून उभे आहेत — भक्तांसाठी, त्यांच्या प्रतीक्षेत. त्यांच्या रूपाचे वर्णन अनेक संतांनी केले आहे.

आषाढी एकादशी ही पंढरपूरमधील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. भक्तगण उत्साहाने, आनंदाने विठ्ठलनामात रंगून जातात. हा एक भक्तीचा पर्व आहे, जिथे श्रद्धा, प्रेम आणि परिश्रम एकत्र येतात.

देवशयनी एकादशी या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेत जातात, म्हणूनच ही एकादशी देवशयनी किंवा हरिशयनी म्हणून ओळखली जाते हा दिवस भगवान विष्णूंनी विश्रांतीस जाण्याची सुरुवात मानला जातो. याला इतर काही नावांनीही ओळखले जाते, जसे की पद्म एकादशी, आषाढी एकादशी आणि हरिशयनी एकादशी.

2025 मध्ये देवशयनी एकादशी कधी आहे?

भगवान विष्णू चार महिने योगनिद्रेत असतात. त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य जसे लग्न, गृहप्रवेश, साखरपुडा, उपनयन इत्यादी केले जात नाहीत.

2025 मध्ये देवशयनी एकादशी 5 जुलै सायंकाळी 6 : 58 वाजता सुरू होऊन 6 जुलै रात्री 9 : 14 वाजता संपेल. या दिवशी म्हणजे 6 जुलै रोजीच देवशयनी एकादशी आहे.

चातुर्मास म्हणजे काय?

चातुर्मास म्हणजे चार महिन्याचा काळ. चातुर्मासाची सुरुवात आषाढ शुद्ध एकादशी पासून सुरू होते तर तो कार्तिक एकादशी पर्यंत मानला जातो. हा अवधी आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंतही असू शकतो. हिंदू धर्मानुसार, देवांचे एक वर्ष म्हणजे एक पूर्ण दिवस असतो. दक्षिणायन म्हणजे देवांची रात्र आणि उत्तरायण देवांचा दिवस असतो. कर्क संक्रांतीच्या वेळी उत्तरायण पूर्ण होतो आणि दक्षिणायन सुरू होतो, म्हणजे देवांची रात्र सुरू होते. आषाढ शुद्ध एकादशीला ‘शयनी एकादशी’ असं म्हणतात कारण त्या दिवशी देव झोपी जातात असं मानलं जातं. आणि कार्तिक शुद्ध एकादशीला ‘प्रबोधिनी एकादशी’ असं म्हणतात कारण त्या दिवशी देव उठतात. साधारणपणे, देवांची रात्र सहा महिने असायला हवी, पण बोधिनी एकादशीपर्यंत चार महिने पूर्ण होतात. याचा अर्थ असा की देवांची रात्रीची एक तृतीयांश वेळ शिल्लक राहते, आणि त्यानंतर देव जागे होऊन कार्य सुरू करतात. हिंदू धर्मानुसार, आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंतचा काळ म्हणजे चातुर्मास आहे. खरंतर, चातुर्मास आषाढ शुक्ल चतुर्दशीला सुरू होतो आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालतो.

चातुर्मास 2025 कधी सुरू होणार आहे ?

चातुर्मास 2025 ही देवशयनी एकादशीपासून सुरू होईल. यावेळी चातुर्मास 6 जुलैपासून 31 ऑक्टोबरपर्यंत असेल. नंतर 1 नोव्हेंबर रोजी देवउठणी एकादशी साजरी केली जाईल. देवउठणीला भगवान विष्णू योगनिद्रातून बाहेर येतात आणि त्या दिवसापासून पुन्हा शुभ कार्य सुरू होतात.

या काळात भगवान विष्णूंचे विश्रांतीचे महत्त्व असते, त्यामुळे धार्मिक नियम पाळले जातात आणि व्रत, पूजा केली जाते.