भक्त प्रल्हादाची गोष्ट (Bhakt Prahlad story in Marathi)
भक्त प्रल्हादाचे नाव तर तुम्हाला ठाऊकच आहे. आज मी तुम्हाला त्याचीच तर गोष्ट सांगणार आहे. प्राचीन काळात हिरण्यकश्यप नावाचा एक राजा होता. तो असुरांचा राजा होता. तो अहंकारी अत्याचारी आणि खूप क्रूर होता. प्रजेला खूप त्रास देत असे. हिरण्यकश्यपूने घोर तप करून देवाला प्रसन्न करून त्याच्याकडून वर मागून घेतला होता की, त्याला मरण माणसाकडून किंवा प्राण्याकडून येणार नाही, दिवसा किंवा रात्री येणार नाही, घरात किंवा घराबाहेर येणार नाही. या वरामुळे त्याला असे वाटले की, त्याला कुणीही मारू शकणार नाही. त्यामुळे राजाला अहंकार झाला. ‘देवांपेक्षा मीच मोठा’, असे त्याला वाटायला लागले. कुणीही देवाचे नाव घेतलेले त्याला सहन होईना.
त्याने पूर्ण सृष्टीमध्ये उत्पाद केला होता. नास्तिक तर होताच, परंतु स्वतःला पूर्ण संसाराचा स्वामी समजायचा. हिरण्यकश्यपूच्या राणीने एका पुत्राला जन्म दिला, त्याचे नाव प्रल्हाद होते. प्रल्हाद विष्णू देवाचा परमभक्त होता. तो जेव्हा थोडा मोठा झाला तेव्हा तो एक दिवस दरबारात आला. राजांनी त्याला प्रेमाने आपल्या मांडीवर बसवले व त्याला विचारले, “बाळा गुरुजींनी तुला कुठल्या प्रकारच्या चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत.” त्यावर प्रल्हाद म्हणाला, मी विष्णू देवाला अधिप्रणाम करतो. जे या सर्व जगाचे सर्वश्रेष्ठ आहे. आपल्या पुत्राच्या तोंडून हे ऐकल्यावर राजा क्रोधित झाला व म्हणाला मीच सगळ्यांपेक्षा शक्तिशाली आहे. तेव्हा प्रल्हाद म्हणाला,”नाही सर्वात शक्तिशाली तर विष्णू देव आहे ज्यांनी ह्या सृष्टीचे निर्माण केले आहे”. हे ऐकतात हिरण्यकश्यपूचे डोळे क्रोधाने लाल झाले त्यांनी गुरु शुक्राचार्यांना बोलावून त्यांना जाब विचारला. तुम्ही माझ्या पुत्राला विष्णू देवाची पूजा आणि भक्ती करण्यास का म्हणून शिकवले. विष्णू हा माझा शत्रू आहे. शांत स्वरात शुक्राचार्य म्हणाले,” मी तुमच्या पुत्राला कुठल्याही देवाची भक्ती करायला नाही शिकवले तो स्वतः पूजा आणि भक्ती करतो”.
राजा मात्र आता क्रोधाने कापत होता. राजाने पुन्हा प्रल्हादाला विचारले की कोण आहे. ज्याने प्रल्हादाला ही भक्ती करायला शिकवली. त्यावेळी पुत्र म्हणाला बाबा मला भक्ती करण्यास कोणी का शिकवेल. ते तर माझ्या हृदयातच विराजमान आहेत. प्रल्हादाचे हे बोलणे ऐकून हिरण्यकश्यप खूप चिडला होता. त्याचा राग आता अनावर होत होता. मी महान आहे माझ्या व्यतिरिक्त आणखी कुठलाही देव ह्या संसारात मोठा नाही. यापुढे भविष्यात तुझ्या तोंडी ‘नारायण नारायण’ नाव येता कामा नये. माझ्या इतका या जगात कोणी श्रेष्ठ नाही. विष्णू ही नाही. पण भक्त प्रल्हादाने राजाचे काहीच ऐकले नाही. त्याची विष्णूची भक्ती चालूच होती. ‘नारायण नारायण’ असा जप करतच तो दैनंदिन कामे करीत असे.
हिरण्यकश्यपूला भक्त प्रल्हादाची भक्ती बघून आता राग येत असे. हिरण्यकश्यपाने विचार केला, हा मुलगा आपल्या कुळाचा नाश करीन.त्याने सैनिकांना प्रल्हादाची हत्या करायचा आदेश दिला सैनिकांनी बऱ्याच प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला परंतु असफल झाले.त्यांनी भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी निरनिराळ्या उपाय योजना केल्या. वेगवेगळ्या शस्त्रानी त्याच्यावर हल्ला केला. त्याचे हात पाय बांधून त्याला समुद्रातही फेकले. उंच पर्वताच्या शिखरावर घेऊन तिथून फेकण्याचा प्रयत्नही केला पण त्याच्या केसाला जरासाही धक्का लागला नाही. भक्त प्रल्हादाचा नारायण नारायण असा जप चालूच होता. प्रल्हाद सुखरूप जिवंतच राहिला त्याला प्रत्येक वेळेस विष्णू देवांनी वाचवले राजा हैराण होऊन शेवटी त्याने प्रल्हादावर पिसाळलेला हत्ती सोडला. परंतु त्या हत्तीने तर त्याला सोंडेने उचलून आपल्या पाठीवर बसवले. राजाच्या कुठल्याही प्रयत्नाला यश आले नाही. प्रत्येक वेळी विष्णू भगवान प्रल्हादाची मदत करत होते.
असेच काही दिवस उलटले. प्रल्हादाचा ‘नारायण नारायण’ असा जप चालूच होता. प्रल्हादाची भक्ती बघून हिरण्यकश्यपू खूप चिडला. त्याने सैनिकांना आदेश दिला प्रल्हादाला कढईतल्या उकळत्या तेलात टाकून द्या. सैनिक मात्र आता घाबरले होते; कारण प्रल्हादाला तेलात टाकतांना उकळणारे तेल आपलाच अंगावर उडून आपण भाजू शकतो याची त्यांना कल्पना होती. पण काय करणार ? राजाची आज्ञा नाही ऐकले तर राजा आपल्याला शिक्षा करेल. म्हणून, त्यांनी प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकले. आता याला कोणीच वाचवू शकत नाही असे राजाला वाटले . हे बघायला या वेळी राजा स्वत: उपस्थित राहिला. चारही बाजूंनी उकळते तेल सैनिकांच्या अंगावर उडाले. सैनिक भाजल्यामुळे ओरडू लागले; पण प्रल्हाद मात्र अतिशय शांत उभा होता. हिरण्यकश्यपू पहातच राहिला. बघता बघता कढईत कमळ दिसू लागले. त्यावर शांतपणे प्रल्हाद उभा होता. पुन्हा राजा चिडला. रागाने आपल्या परिवारासह निघून गेला.
शेवटी एक दिवस राजाने प्रल्हादाच्या भक्तीला कंटाळून त्याला विचारले, ”बोल, कुठे आहे तुझा नारायण ?” प्रल्हादाने सांगितले, ”सृष्टीच्या कणाकणामध्ये, सगळीकडे माझा नारायण आहे”. जवळच एक खांब होता. राजाने विचारले या खांबात पण तुझा देव आहे. प्रल्हाद हो म्हणाला. राजाने चिडून त्या खांबाला लाथ मारली, ”दाखव तुझा देव या खांबात कुठे आहे.” तोच जोर जोरात गर्जना करत नरसिंह खांबातून प्रगटला. माणसाचे शरीर आणि सिंहाचे डोके (म्हणजे माणूस किंवा प्राणी नाही), उंबरठ्यावर (म्हणजे घरात किंवा घराबाहेर नाही), सायंकाळी (म्हणजे दिवसा किंवा रात्री नाही), अशा वराच्या अटी पाळून नरसिंहाने हिरण्यकश्यपूच्या पोटात नखे रोवून पोट फाडून त्याचा नाश केला; कारण शस्त्र किंवा अस्त्राने मरण येणार नाही, असा हिरण्यकश्यपूला वर होता.
हिरण्यकशपाला मारल्यानंतर नरसिंहाचा राग शांत झाला नाही तेव्हा भक्तप्रल्हादाने त्यांचे पाय धरले. तेव्हा नरसिंहाने प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेतले आणि सांगितले मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालो आहे. तुला सर्व लोक कायम लक्षात ठेवतील असे म्हणत नरसिंह अदृश्य झाले. प्रल्हादाच्या भक्तीला आजही सर्व मानतात.
Read more Bedtime stories for kids : श्रावण बाळाची गोष्ट