आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा आपला हेतू साध्य होणारे व्रत म्हणजे प्रदोष व्रत.या प्रदोष व्रतामध्ये उमा महेश्वराची म्हणजेच शिवपार्वतीची पूजा केली जाते. या प्रदोष समयी उमा-महेश्वराची पूजा सांगितलेली आहे. त्याच समयाला गंधर्व, यक्ष, किन्नर हेही उपस्थित असतात. साहजिकच, सर्वांचे आशीर्वाद मिळतात. पूर्वापार आलेली एक आख्यायिका अशी आहे, तिन्हीसांजेच्या वेळी शंकर-पार्वती नंदीवरुन पृथ्वीप्रदक्षिणा घालतात. जिथे जिथे ॐ नमः शिवाय या मंत्राचे नामस्मरण व शिवपूजा चाललेली असते तिथे तिथे भोळा भवानी शंकर तथास्तु म्हणून आशीर्वाद देतात आणि ही वेळ म्हणजेच प्रदोष समय. म्हणून प्रदोषव्रताचे जास्त महत्त्व आहे. पुढे प्रदोषाचे माहात्म्य, माहात्म्य, व्रत-नियम दिले आहेत.

प्रदोष म्हणजे काय ?

सूर्यास्तापूर्वीच्या ३ घटका म्हणजे प्रदोष, हा प्रदोष शुद्ध व वद्य पक्षातील त्रयोदशीला असतो. सोमवारी सोमप्रदोष, मंगळवारी भौमप्रदोष व शनिवारी शनीप्रदोष म्हणतात. प्रत्येकाचे महत्त्व वेगवेगळे आहे. पुढे वर्णनात ते समजेल. शनीप्रदोषाचे महत्त्व जास्त सांगितले आहे.

प्रदोषाचे माहात्म्य

प्रदोष समयी उमा-महेश्वराची पूजा शोडषोपचारे करावी, असे माहात्म्य आहे. रुद्र सूक्ताने पूजा केल्यास शिवाला जास्त प्रिय आहे. दिवसभर निराहार म्हणजे काही न खाता अथवा तिखटमीठ न खाता रहावे, संध्याकाळी उमा- माहेश्वराची पूजा करावी, स्नान करावे. पांढरेधूत वस्त्र नेसावे. पूजा झाल्यानंतर उपास सोडावा.

प्रदोषव्रत कथा

ॐ नमः शिवाय ॥ ॐ मंगलमूर्ति विघ्नहरा दूरित नाशना गौरीकुमरा ॥ वंदन करितो प्रथम तुला । नमितो नंतर सरस्वती ॥१॥ आद्य माता विश्वजननी । गुरुरायाच्या नमितो चरणी । शिवरायाचे ध्यान करुन आरंभीली कथा प्रदोषाची ॥२॥ एकदा नैमिषारण्यात । ऋषींनी केले नाना कथा कथन | त्यातील एकाचे महत्त्व जाणुन । सांगावे वाटते तुम्हांसी ॥३॥ राजा एक सत्यव्रत । सुशील सृजना होता जाण । जनतेचे समृद्ध करी रक्षण । पालन करी सर्वांचे। युद्ध करीता शलया साथी । धारातिर्थी पडला भूवरी । भार्या मागे राजस्त्री । होती ती गर्भवती ॥४॥ पतीची वार्ता ऐकुनी । घायाळ झाली गर्भवती ॥ प्रसुत झाली तिथेच ती ।। पुत्रजन्म जाहला ॥५॥

शोक आवरेना बावरी प्राण सोडला भुवरी । नवजात राजपुत्र । राहिला मागे एकटा ॥६॥ बाळाचे रडणे ऐकून ॥ ब्राह्मणी आली तेथे एक ॥ उचलुनी घेतले अर्भका । निश्चय केला सांभाळण्याचा ॥७॥ स्वतः असे निर्धन परंतु मन मोठे करुन । निज पुत्र सुचिव्रत । सांभाळ करी दोघांचा ॥८॥ संस्कार केले दोघांवरी । व्रतबंध जाहले वेळेवरी । दिन सरले झणकरी । झाले दोघे तरुण ॥ ९ ॥ एकदा जाता शिवमंदिरी । देखिले तिथे शांडिल्य मुनी । दंडवत घातले तिघांनी पायी माथा ठेवोनिया ॥ ९ ॥ मनीची व्याकुळता पाहून शांडिल्य मुनी झाले प्रसन्न । बोलते झाले मुनी जाण । करु नको कसला विचार ॥१०॥ आचरशील प्रदोष व्रत । दारिद्र्य, पीडा जाईल निघून । येतील मग सुदिन । रहावे मग आनंदी ॥ ११ ॥ मुनीची ऐकता अद्भुत वाणी । विचारीले व्रत नियम ब्राह्मणी । व्रत त्रिधान सांगुनी आम्हांसी । कृपा करावी आम्हांवरी ॥१२॥

मुनी सांगती व्रत विधी । दोन्ही पक्षातील त्रयोदशी । प्रसन्न करण्या शिवशंकरासी । प्रदोष व्रत आचरावे ॥१३॥ त्रयोदशीच्या दिनी निराहार करोनी । श्वेत वस्त्र धारण करुनी । मनी स्मरावा उमा महेश्वर ॥ १४ ॥ सुर्यास्ता समयी स्नान करुनी । शुर्चिभूत होऊनी सांजवेळी । शोडषोपचार पूजा करावी । शंकराची मनोभावे ॥ १५ ॥ जप आणि स्तुती । करावी शिवशंकराची । करुणा भाकोनी । पार्वतीची सेवेत त्यांच्या मग्न व्हावे ॥९६॥ जयजयाजी शंकरा । शुभंकर कृपा करा । रक्षिसी आम्हां भक्त वत्सला । भोळा भाव जाणुनी ॥१७॥ शिवशक्ती या व्रताची देवता । दिनभरी उपास करावा । ब्राह्मण भोजन अथवा शिधा द्यावा नंतर दक्षिणा द्यावी हा विधी ॥ १८ ॥ कैलास प्रितीची घेऊन फुले । अंतर मनानी बोलवावे । तबक पुजेचे पूर्ण रचावे । पूजा करावी उमा महेशाची ॥ १९ ॥ हृदयमंदिरी स्थान द्यावे । शंकर पार्वतीसी प्रार्थावे । महतीचे त्यांचे गोडवे गावे । प्रसन्न करावे चंद्रशेखरा ॥ २० ॥

शिवशंभो तू दिन दयाळा । त्वरेने आवरी प्रलयंकारा । रक्षिसी तू भवसागरा । वर्णू तुझा काय महिमा ॥ २१ ॥ भक्ताची कठीण भक्ती पाहून । वर देऊनी आनंदून । मनीची इच्छा पूर्ण करुन । सुखे ठेविशी भक्ता तू ॥२२॥ विद्यार्थ्याशी विद्यार्जन । निर्धनासी देशी धन । विवाहोत्सूकांची इच्छा पूर्ण करीतसे । तू पापक्षालन करीतसे ॥२३॥ जगदीश्वरा गिरीजाशंकरा । पूजा सेवा अमुची स्विकारा । पिडीतांचे दुःख निवारा । भक्ति अमुची तुमच्या पायी ॥२४॥ पूजा नंतर दुजा दिनी । गोरगरीबांना अन्न देऊनी । मनी संतोष पाऊनि । जपावि पूजा प्रदोषाची ॥ २५ ॥ प्रदोष व्रत जो आचरितो । एक वर्ष पूर्ण करितो । शंभो पूर्ण करितो मनोरथ । चारही पुरुषार्थ होतील प्राप्त ॥ २६ ॥

शांडील्य मुनींचे ऐकुनी कथन । ब्राह्मणी मनी उठली आनंदून । मनी प्रदोष व्रत संकल्पून । मुनींच्या पायी घातले लोटांगण । मुनींनी दिला अभयवर । व्रताचे पूर्ण करी आचरण । शंकर तुजवरी होई प्रसन्न । ठेविला माथी तिच्या हस्त ॥ २८ ॥ शुद्ध वद्य त्रयोदशी तिथी । तिघेही उपास करिती निर्जली । स्नान करोनी प्रदोष वेळी । पूजा करिती उमामहेश्वरावी ॥ २९ ॥ एकदा सुचिव्रत पडला बाहेर । पहावे वनीचे सौंदर्य मनोहर । मार्गी देखिली वस्तू सुंदर । हंडा दिसला सुवर्ण मुद्रांचा ॥३०॥ गगनचुंबी आनंद मनीचा महिमा हा प्रदोष व्रताचा । फलप्राप्ती व्रत नेमाचा । उचलुनी आणिला आपुल्या घरा ॥३१॥ देखिता द्रव्य माता संतोषली । चंद्रमौळी कृपा करी । अल्प श्रमात ही फलप्राप्ती । सूतासी वदे घ्या दोघे वाटुनी ॥३२॥ मुळचा धर्मगुप्त थोर उदार । लालसा नसे मनी कणभर । माते स्वामी तो त्याचा अधिकार । नको मज काही शिव ध्यानासमोर ||३३||

अचानक एकदा भ्राता दोन्ही गेले फिरण्या वनातूनी । विस्मय त्यांच्या वाटे मनी । दृश्य पाहता तेथील ॥ ३४ ॥ युवती एक लावण्यवती । शरीर सौष्टव उठुन दिसती । सोन्यामोत्यांचे अलंकार ल्यालेली । देखीता भान हरपले ॥३५॥ जाऊनी पुसता राजपुत्र । कोण कुठली तु सुंदर मन झाले आकर्षित । देखितां दोघां एकमेकांसी ॥३६॥ बावरल्या युवतीच्या सख्या । मधुर वाणी मदन रुप देखिता । भुवनी वदती राजपुत्र । मोहित झाले मी तुम्हांवरी ॥३७॥ सख्यांना सांगे जा आणा कमळ । राजपुत्राच्या जाई जवळ । बोले धर्मगुप्ताशी सलज्ज । नांव माझे अंशुमती ॥ ३९ ॥ माझा पिता विद्रवीक गंधर्वराज । मनी इच्छिले मी तुम्हांवर । कराल जरी माझा स्वीकार । द्रव्य तुम्हांस मिळेल अपार ॥ ३९ ॥

मदनासमान श्रेष्ठ पुरुषा । कुलीन तरुण तुम्हीच दिसता । जाळावया मन झाले आतुर आता । सांगा आपण कोण कोठले ॥४०॥ बोले तिजसी धर्मगुप्त । विदर्भाचा मी राजपुत्र । परंतु मला नाही आप्त । असे मी एक पोरका ॥४१॥ शत्रुनी राज्य लुटले । माता पित्यासी जाण्या झाले कारणे । सांभाळीले जन्मता निर्धन ब्राह्मणीने । उपकृत मी मातेचा ॥४२॥ लग्नाआधी घेऊनी ये आशा । गंधर्व पित्याची तू कन्या रे ॥ कैसी देतील संमती तुजला । राजपुत्र आहे मी असा ॥४३॥ परंतु अंशुमती असे ठाम निश्चयापासून न ढळे जाम । टेऊनी राजपुत्रा गळीचा हार । सांग त्यासी ये तिसऱ्या दिनी ॥४४॥

प्रथम दर्शनी प्रेम जडले । काम खास होईल आपुले । मात्यापित्याच्याप प्रेमामुळे बंधनमुक्त होऊ आपण ॥४५ ॥ सख्या सवे गंधर्व पुत्री । गेली आपुल्या निज घरी । जाताना राजपुत्रासी निरोप देई । पित्यासवे येईल निश्चिंत रहा ॥४६॥ धर्मगुप्त सुचीव्रत भ्राता । घरासी आपुल्या परतुनी येता । प्रेमळ मातेसी हर्षती भेटता । वृत्तांत सांगता झाले ते ॥४७॥ तिघांच्या नयनी आले पाणी । शिवप्रदोषाची आठवूनी करणी । मनोमनी जप स्मरुनी । म्हणती उमामहेश्वराभ्यां नमः ॥४८॥ इकडे अंशुमती कथे पित्यासी । राजकुमार आवडला मजसी । मनाने इच्छिला वर त्यासी । लाडकीस ही भेट द्यावी ॥ ४९ ॥ पित्यासवे जाऊनी शिवमंदिरी । प्रार्थना करीते उमामहेश्वर चरणी । धर्मगुप्तासी राज्य द्या परत मिळवुनी । विनंती ही शिवशंकरा ॥५०॥

शंकराने दिधला आशिर्वाद मनिची इच्छा होईल तृप्त । तथास्तु म्हणोनी ठेविला हस्त । पितापुत्री झाली दोघे आनंदी ॥५१॥ भगवद् बोले गंधर्वासी। कन्येचा तो योग्य सोबती । कल्याण होईल विवाह मीती । शुभ संकेत हा माझा ॥ ५२ ॥ वनराईत त्या दोघे येता । राजपुत्राची भेट घडता । आनंदी मनी झाला पिता । जावई असे हा शुभलक्षणी ॥५३॥ विद्रावीक बोले धर्मगुप्तासी । स्वीकारा मम लाडक्या कन्येसी । धनद्रव्य अपार देईल तुम्हांसी । राज्य तुमचे परत मिळेल ॥५४॥ दोघांचे दिले हात हातात । पुष्पमाळा घातल्या गळ्यात । घुमले मंजुळ सर्वत्र स्वर । शुभमंगल जाहले ॥५५॥

उमटले गायनाचे मधुर स्वर । यक्षकिन्नरांचे सुरेल वादन । अप्सरांचे सुंदर नर्तन । वनराईत आली प्रसन्नता ॥५६॥ देवदेवता आशिर्वाद देती । वनराणीही फुले उधळती । झाली ऐसी विवाहपूर्ती । सर्वत्र झाला आनंदी आनंद ॥५७॥ सैन्यासहित सुवर्णरथ । धनसंपत्ती अगणित । शस्त्रास्त्रेही त्या सोबत । दिले गंधर्वाने राजपुत्रा ।।५८ ॥ तैशाच आवडत्या दासी । मुगुट अलंकार नाना प्रती । देऊनी लाडक्या कन्येसी । विद्रावीक गेला गंधर्वनगरीसी ॥ ५९ ॥ धर्मगुप्त गेला विदर्भासी । युद्ध करुनी राज्य मिळवीसी । प्रजा डोळे भरुनी पाहती । आनंदमयी अद्भुत सोहळा ॥६०॥ सुमुहूर्त एक बघुनी । राज्याभिषेक तयास करुनी । राजाराणीस बैसऊनी । सुवर्ण सिंहासन शोभीले ॥६१ । नामकरण नंतर करिता । ब्राह्मणीस राजमाता । सुचिव्रत प्रधान । झाले सर्व पापमुक्त ॥ ६२ ॥

ऐसी महती प्रदोषाची । चतुर्विद्य पुरुषार्थ अंकीत होती । मनोवांछीत इच्छापूर्ती । पापनाश मिळो मुक्ती ॥ ६३ ॥ आचरतील जे हे व्रत । लक्ष्मी होईल त्यासी प्राप्त । आनंदतील उमा महेश्वर । पापदु:ख होईल हरण || ६४. जे कथा ऐकतील ! अथवा पठण करतील । संतोष ऐश्वर्य मिळेल । शंकराची होईल कृपा ॥ ६५ ॥ श्रोते हैं, ऐका आता । प्रदोषाची महत्त्वता । वारांची त्या प्रसन्नता । नामे ही प्रदोषाची ॥ ६६ ॥ शनी प्रदोष शनिवार । सोम प्रदोष सोमवारी । भौम प्रदोष मंगळवारी ! महती त्यांची त्या त्या वारी ॥ ६७ ॥ कृष्ण पक्षातील त्रयोदशी । प्रदोष होईल फलदायी । विशेष भारी मानती । भक्तगण हीच महती ॥ ६८ ॥ शनी प्रदोषी अपत्य प्राप्ती । सोम प्रदोषी सौभाग्य प्राप्ती । भौम प्रदोषी ऋणमुक्ती । विवाह जमतील सोम प्रदोषी ॥ ६९ ॥ तैशीच समृद्धी सोम प्रदोषी । सुखप्राप्ती शुक्रवार प्रदोषी । उदंड आयुआरोग्य प्राप्ती । रवीप्रदोष तो होईल ।। ७० ।। जगदीशाच्या सांगण्या वरुनी जयश्री महती सांगे प्रदोषाची! प्रार्थिते उमा-महेश्वरासी । श्रद्धाभक्त होवो सुखी ॥७१॥

ॐ नमः शिवाय । उमामहेश्वराभ्यां नमः ।
शुभं भवतु । शिवार्पणमस्तु ॥

By vsadmin