श्रावणमासापासून सणांना जी सुरूवात होते ती असते दिवाळीपर्यंत. दिवाळीनंतर असणारा ऋतु इतका सुंदर व आल्हाददायक असतो की, वसंतऋतुच्या आगमनापर्यंत प्रत्येक दिवस व सण ही एक पर्वणीच असते. भाद्रपद महिन्यात येणारे हरितालिका व्रत हे वर्षाऋतुतील महिन्यात येत असल्याने पावसामुळे वातावरणात गारवा जाणवत असतो, अशा वातावरणात हे व्रत येत असते. हरतालिका हे व्रत मनासारखा पती लाभावा व असलेल्या पतीला उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो म्हणून हे व्रत करतात. पार्वती माता ने शंकराला आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हरतालिका है व्रत केले होते. तेव्हापासून स्त्रिया व मुली हे व्रत करतात.
वटसावित्री, मंगळागौर व हरितालिका ही महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आवडती व्रते. त्यातही हरितालिका व्रताचे खास वैशिष्ट्य आहे. या व्रताची देवता भगवान शिव व पार्वती माता आहेत. पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरले होते, तिचा पिता दक्षप्रजापती याने एकदा यज्ञात शंकराचा अपमान केला. तो सहन न होऊन पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वत:ला जाळुन घेतले व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली. पुन्हा उग्र तप करून पुन्हा ती भगवान शंकरांची अर्धांगी झाली. अशी ही दृढनिश्चयी व स्वाभिमानी पतिव्रता पार्वती, ही आर्य स्त्रियांचा महान आदर्श आहे. म्हणून तिची पूजा करून तिच्याजवळ पतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागावयाचे असते आणि स्वत:चे सौभाग्य अखंड राखण्यासाठी तिची प्रार्थना करायची असते.
हरितालिका तारीख आणि मुहूर्त
भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल तृतीयेला हरतालिका हे व्रत केले जाते. यंदा हरतालिका तिथी ही ६ सप्टेंबरला असणार आहे. हे व्रत महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या भागातही केला जातो. प्रत्येक राज्यात या दिवसाचे वेगवेगळे महत्त्व आहे.
हरितालिका हे व्रत कोणी करावे ?
हरतालिकेचा व्रत कोणतीही स्त्री करू शकते. कुमारिका सौभाग्यवती स्त्रिया किंवा त्यांचे पती हयात नाहीत त्या स्त्रिया सुद्धा हे व्रत करू शकतात. पार्वती मातेने हे व्रत केलं होतं महादेव पती म्हणून मिळावेत यासाठी. पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीला दर्शन दिले. भगवान शंकरांनी तेव्हा पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले. तेव्हापासून जगभरातील मुली विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि मुली चांगला पती मिळावा यासाठी दरवर्षी हरतालिकेचे व्रत करू लागल्या. असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांची मनोभावे पूजा केली तर विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते व मुलींना त्यांच्या मनासारखा चांगला जोडीदार मिळतो यासाठी हे व्रत करतात.
हरितालिकेची पूजा कशी करावी ?
सर्व स्त्रियांनी या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करावे . हरितालिका हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी प्रथम आपण हे व्रत करत आहोत असा संकल्प करावा व त्यानंतर पूजा करावी संकल्प केल्याशिवाय कोणती पूजा ही पूर्ण होत नाही असे मानले जाते त्यामुळे संकल्प अवश्य करावा. या दिवशी उपवास करावा. नंतर दुपारी चौरंग मांडून त्यावर नदीतील वाळू आणून शिवलिंग तयार करून षोडशोपचार पूजा करावी. पूजा करत असतांना ‘उमामहेश्वर देवताभ्यो नमः’ हा मंत्र म्हणावा.
स्त्रियांच्या अनेक व्रतांमध्ये हरितालिका हे व्रत श्रेष्ठ आहे. माता पार्वतीने हरितालिका व्रत आचरण करून कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकराची प्राप्ती करून घेतली. त्याची आठवण म्हणून व मनासारखा पती लाभावा व असलेल्या पतीला उदंड आयुष्य लाभो म्हणून हे व्रत करण्यात येते.
हरितालिका व्रताची कथा
हिमालयाची कन्या पार्वती लग्नायोग्य झाली. पित्याच्या मनात तिचा विवाह कुणाशी करावा याची चिंता उत्पन्न झाली. एक दिवस नारायण-नारायण करीत नारद मुनी तेथे आले. मुनी म्हणाले – “विष्णूने तुझ्या मुलीस मागणी करण्याकरीता मला पाठविले आहे !” असा निरोप नारदाने दिला. हे ऐकून पार्वतीस वाईट वाटले, कारण तिला भगवान शंकराबरोबर विवाह व्हावा हीच इच्छा होती व तेच पती म्हणून मिळावे म्हणून पार्वतीने उग्र तप केले होते. तिचा पिता हिमालय राजा याने तिला विष्णूला देण्याचे ठरविले म्हणून पार्वती रागाने सखीसह अरण्यात निघून गेली. तेथे नदीकाठी वाळुचे शिवलिंग तयार करून तिने त्याची पूजा केली. तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. त्या दिवशी पार्वतीने उपोषण म्हणजे कडक उपवास केला. पूर्णपणे व्रतस्थ राहुन भक्तिभावाने शिवाची उपासना केली. तिच्या उपासनेने भगवान शंकर प्रगट झाले आणि तुझी इच्छा पुर्ण होईल असा वर दिला. अशी हरितालिकेची कथा सांगितली जाते.
पार्वतीमातेने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले. तोच उद्देश समोर ठेऊन सर्व उत्कृष्ट गुणांनीयुक्त असा पती मिळावा म्हणुन कुमारीका मुली हे व्रत करतात व मिळालेला पती दीर्घायुषी व आरोग्यवान व्हावा म्हणुन सुवासिनी भगिनी हे व्रत करतात. पुनर्जन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणुन विधवा स्त्रिया या व्रतानिमित्त फक्त उपवास करतात पूजा करीत नाही.
आपले पौराणिक वाक्य समजावून घेण्यासारखे आहे. विश्वात नररूप शिव व नारीरूप उमा म्हणजेच पार्वती आहे. आणि ही दोन्ही जगाची पूर्णरूपे आहेत. उपनिषदात याचा स्पष्ट उल्लेख आहे.
‘रूद्रो नर उमा नारी तस्मै तस्मै नमो नमः ।
रूद्रो ब्रम्हा उमा वाणी तस्मै तस्मै नमो नमः ॥
रूद्रो विष्णु उमा लक्ष्मी तस्मै तस्मै नमो नमः ॥
रूद्र हे सूर्य आहे उमा त्याची प्रभा आहे. रूद्र हे फुल आहे उमा त्याचा सुगंध आहे. रुद्र आहे उमा त्याची देवी आहे. वास्तविक सृष्टीच्या मुळातच दोनतत्ये आहेत. भगवान शंकर कृपाळू, दयाळू, मायाळु, भक्तवत्सल व प्रेमळही आहेत. यालाच ‘उमा-महेश्वर म्हटले आहे. म्हणून आपण हरिताललिकेच्या दिवशी उमामहेश्वराची पूजा करीत असतो.
ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, देवांमध्ये विष्णु श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे. त्याचप्रमाणे हरितालिका व्रत हे व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले जाते. म्हणुन या व्रताने मनुष्य पापापासून मुक्त होतो, सात जन्माचे पातक नाहिसे होते, स्त्रियांचे सौभाग्य वाढते.
हरितालिकेचे व्रत हे भगवान शंकरांना प्रसन्न करण्याबरोबरच देवांचे तात्काळ आरोग्यदायी आशीर्वाद मिळवून देणारे व शरीर मन तृप्त करणारे आहे. शहरातून खेड्यातून अनेक ठिकाणी वटसावित्री, मंगळागौरी, हरितालिका पूजा स्त्रिया सामुदायीक रितीने करतात. सहभावनेच्या दृष्टीने ही प्रथा फारच चांगली आहे.
यादिवशी श्री उमामहेश्वराची पूजा करावी व रात्री जागरण करावे. ११ वेळा भगवान शंकराचे ‘शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो’ हे भजन करावे. असे हे व्रतामध्ये श्रेष्ठ असे हरितालिका व्रत आहे. कल्यांण करणाऱ्या, वृषभचिन्ह ज्याच्या ध्वजावर आहे अशा शंकराला व पर्वत कन्येला वारंवार नमस्कार असो..