गणेशचतुर्थी
आपला हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला खूप महत्त्व आहे. गणेश चतुर्थी हा सण गणेशाचा जन्माचा दिवस म्हणून आपण साजरा करतो. सगळ्या जगाचे विघ्न दूर करणारे आपले गणपती बाप्पा तसेच विघ्नहर्ता गणेश चतुर्थीला मोठ्या थाटामाटात आपल्या घरी येतात. संपूर्ण जगभरात गणेश चतुर्थी मोठ्या आनंदाने आणि सामूहिक रित्या साजरी केली जाते
श्री भाद्रपद शुद्ध चतुर्थीला ‘महासिध्दी विनायकी चतुर्थी म्हणतात. हा गणेशाचा उत्सव भाद्रपद महिन्यात १० दिवस असतो या चतुथींच्या दिवशी ’सुखकर्ता दुखहर्ता‘ अशा गजाननाचे आगमन होते. गणेश चतुर्थीला गणपती घरोघरी बसविले जातात. गणपती बाप्पा दहा दिवस येतात आणि संपूर्ण वातावरण भक्तीमय करून जातात. यावर्षी गणेश चतुर्थी नेमकी कधी आहे मुहूर्त कोणता आहे तर ते आपण या ब्लॉगमध्ये जाणून जाणून घेणार आहोत.
गणेश चतुर्थी कधी आहे ?
गणेश चतुर्थी दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरी केली जाते आणि अनंत चतुर्थी पर्यंत गणपती बाप्पा आपल्या सोबत राहतात यावर्षी गणेशोत्सव सात सप्टेंबर 2024 रोजी सुरू होणार असून 17 सप्टेंबर 2024 रोजी गणपती विसर्जन होणार आहे.
श्री गणेशचतुर्थी कथा
पार्वतीने एक दिवस स्नान करतांना आपल्या अंगावरच्या मळा पासुन एका सुंदर मुलाची मूर्ती बनवली व तिला सजिवत्व दिले व त्या मुलाला द्वार रक्षक बनविले. “माझे स्नान होईपर्यंत आत कुणालाही येऊ देऊ नकोस!” असे त्याला बजावले. एवढ्यात तेथे प्रत्यक्ष भगवान शंकर आले; त्यांना त्या मुलाने आत जाऊ दिले नाही तेव्हा भगवान शंकर संतापले त्यांनी ताबडतोब त्या मुलाचे शिर उडवले. थोड्या वेळाने पार्वतीमाता तिथे आल्या त्यांना सर्व प्रकार समजला त्या दुःखी झाल्या. नंतर भगवान शंकरांनी आपल्या सेवकांना सर्वत्र पाठवले प्रथम जो कुणी प्राणी भेटेल त्याचे मस्तक आणा अशी आज्ञा दिली, सेवक रानात भटकू लागले त्यांना प्रथम दिसला तो इंद्राचा हत्ती. त्या हत्तीचे मस्तक मुलास जोडले.
या संबंधी गणेश चतुर्थीची आणखी एक कथा पुराणात सांगितली आहे.
फार वर्षांपूर्वी सिंदुरासुर नावाचा एक राक्षस सगळ्या जगाला फार त्रास देत होता, तो स्वर्गात गेला तेथील देवांचा पराभव केला सगळे देव घाबरून लपून बसले. मग तो पृथ्वीवर सगळ्यांना त्रास देऊ लागला त्याने यज्ञात विघ्न आणले मंदिरे फोडून टाकली, आश्रम नष्ट केलेत, देवब्राह्मणाना त्रास देवू लागला. घाबरलेले सारे देवगण भगवान विष्णुंकडे गेले. भगवान विष्णु देवांना म्हणाले,
“मी पार्वतीच्या उदरी गजाननरूपाने जन्मास येईल व सिंदुरासुराचा नाश करीन!” मग भाद्रपद महिन्यातील शु. चतुर्थीला भगवान विष्णुंनी पार्वतीच्या उदरी जन्म घेतला, त्या बाळाला मस्तकच नव्हते तेव्हा शंकराने गजासुराला ठार मारले व त्याचे मस्तक त्या बालकाला बसवले.
हा गजासुर म्हणजे हत्तीचे रूप घेतलेला शापीत राजा होता. गजासुराचे मस्तक लावल्याने त्या बालकाला ‘गजानन’ असे नाव मिळाले. आपल्या नाशासाठी विष्णुने गजाननाचा अवतार घेतला आहे. हे सिंदुरासुराला समजले, तो गजाननास ठार करण्यास आला.
गजाननाचे व सिंदुरासुराचे घनघोर युध्द झाले गजाननाने सिंदुराला ठार मारले. स्वर्गातील देवांना व पृथ्वीवरील लोकांना खूप आनंद झाला ही घटना भाद्रपद चतुर्थी या दिवशी घडली. सर्वांनी गजाननाच्या विजयाचा उत्सव साजरा केला.
लोकांनी गजाननाला आपला अधिपती गणपती केला त्या दिवसापासुन ‘गणेशचतुर्थी‘ सण सुरू झाला.
गणेश विसर्जन २०२४ कधी आहे?
गणेश उत्सव किंवा गणेशोत्सव १० दिवस चालतो. काहीजण आपल्या परंपरेनुसार १, दीड, ३, ५, ७ दिवसही गणपती बसवतात. परंतू १० दिवसांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशोत्सवाची सांगता होते. या दिवसाला गणेश विसर्जन असेही म्हणतात. यावर्षी गणेश विसर्जन १७ सप्टेंबर २०२४ रोजी मंगळवारी आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भाविक बाप्पाला निरोप देतात. तलाव किंवा नदीत गणपतीची मूर्ती विसर्जित करण्याची परंपरा आहे. “गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या” अशा अशा घोषणा देत गणपती बाप्पाला मोठ्या आनंदाने निरोप देतात.