श्री क्षेत्र काशी

वरुणा आणि असि या दोन नद्यांमध्ये त्यांच्या संगमावर परमेश्वराने एक दिव्य आणि भव्य नगरी बसविली. तीच ही “वाराणसी” (काशी). काशी म्हणजे सरस्वतीचे-विद्येच्या देवतेचे माहेर. भारतीय संस्कृतीचे केन्द्रस्थान म्हणजे काशी । होय. साक्षात परमेश्वरनिर्मित ही नगरी म्हणजे परमेश्वराने निर्मिलेली सुसंस्कृत व तेजस्वी नगरी होय. हिच्या नवलौकिका-मुळे खुद्द देवतांना सुद्धा काशी विषयी ईर्ष्या आणि मोह उत्पन्न झाला.

आपल्या स्वगपिक्षाही ही नगरी सुंदर आहे असे देवराज इंद्राला वाटले. इंद्राने हीनगरी समक्ष पाहून येण्यासाठी व चक्षुर्व सत्यं जाणून घेण्यासाठी अग्निदेवाला भूलोकीच्या काशी नगरीमध्ये पाठविले. वाराणसी काशी स्वर्गापेक्षा कोणत्याही बाबतीत उणी नाही-कमी नाही याचा अनुभव आल्यामुळे अग्निदेव आश्चर्यचकित झाला आणि काशीच्या मोहात अडकला व त्याने येथेव वास्तव्य करण्याचे ठरविले.

वाराणसीचे रहिवाशी है अंतर्बाह्य निर्मळ, पवित्र, स्वच्छ आहेत असे आढळल्याने वायुदेवाने पण येथेच राहण्याचा निर्णय घेतला. वायुदेव सुद्धा परतले नाहीत म्हणून मग इंद्राने सूर्यदेवतेला त्यांचा शोध घेण्यास पाठविले. वाराणसी स्वर्गतुल्य असल्याचे अनुभवल्याने सूर्यदेवता पण येथे राहू लागली. मग पाले आली चंद्राची. या तिघांना शोधण्यासाठी आलेला चंद्र, पृथ्वीतलवरीलही अलौकिक वाराणसी पाहून तो पण येथेच राहिला.

अशा रीतीने सर्व देवदेवतांचे वास्तव्य वाराणसीत झाले. जेथे येण्यासाठी अनेक देवदेवता प्रयत्नशीलअसतात त्या नगरीचे दर्शन घेण्याची इच्छा मानवाला होणे साहजिकच आहे. त्यामूळेच प्रतिवर्षी भारतच्या विविध भागातून श्रीकाशीविश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी असंख्य भारतीय काशी मध्ये येत असतात. देवीदास यांनी आत्मसमर्पण केले आणि काशीत आले तेव्हांपासून भगवान विश्वेश्वर काशीमध्ये आहेत. ‘काश्यां मरणांमुक्तिः’ अशा या काशीमध्ये मृत्यु आल्यास त्या व्यक्तीला सम्पूर्णतः मोक्ष मिळतो अशी भारतीयांची श्रद्धा आहे. काशी म्हणजे भारताची छोटी आवृत्ती होय-छोटा भारत होय. भारताची सांस्कृतिक, धार्मिक राजधानी म्हणजे वाराणसी. ही भारताची सर्वात प्राचीन नगरी होय. हिन्दूधर्मियांचे सर्वात पवित्र स्थळ म्हणजे काशी वाराणसी.

काशीचं महत्त्व

वाराणसी चे दुसरे नाव म्हणजे काशी. काशी ही भगवान शंकराची नगरी मानली जाते. बरेच लोक काशीला मोक्ष नगरी म्हणून ओळखतात. काशीमध्ये मरण येणं म्हणजेच मोक्षप्राप्ती होय.
यामुळेच काशीला विशिष्ट धार्मिक महत्त्व आहे. पुरातन काळापासून काशीची ओळख धार्मिक नगरी म्हणून केली जाते. इथे हजारो भाविक वर्षभर दर्शनासाठी येतात. गंगेच्या किनाऱ्यावर असलेल्या काशीत अनेक जुने मंदिर आहेत, जी धार्मिकदृष्ट्या खूप ͏महत्त्वाची आहे.

काशी विश्वनाथ मंदिर

ध्यायेन्नित्यं महेशं रजतगिरीनिभं चारुचन्द्रावतंसं । रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नम् ॥
पद्मासीनं समन्तात्स्तुतममरगणैर्व्याघ्रकृति वसानं । विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रम् ॥

ज्याची कांती चांदीच्या पर्वतासमान आहे, ज्याने अलंकार म्हणून चंद्र जटेमध्ये धारण केला आहे, निरतिराळ्या रत्नांनी ज्याचे शरीर विभूषित आहे. ज्याच्या हातात परशु मृग व अभय आहेत, जो पद्मासनावर विराजमान झाला असून ज्याच्या चारीही बाजूस देवगण उभे राहून स्तुति करत आहेत, ज्याने व्याघ्रचर्म पांघरलेले आहे, जो विश्वातील भयांचा नाश करणारा आहे, ज्याला पांच तोंडे जो त्रिनेत्री आहे अशा या महेश्वराचे प्रतिदिन हजारो भाविक दर्शन करत असतात.

भारताचे केन्द्र स्थान काशी तर काशी चे केन्द्र स्थान श्री काशी विश्वनाथाचे मंदिर. काशी विश्वनाथ मंदिर हे काशीचं सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे, जे भगवान शिवाला समर्पित आहे. हे मंदिर वाराणसीच्या मध्यभागी आहे आणि दरवर्षी लाखो भक्त इथे येऊन दर्शन घेतात. हिंदू धर्मातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून या मंदिराचं खूप महत्त्व आहे.

विश्वनाथाचे मंदिर सोनेरी मंदिर म्हणून ही ओळखले जाते. मंदिराचे मुख्य द्वार चांदीच्या पत्रांनी बनविले आहे. या मंदिरात शिवलिंग स्वयंभू आहे असा काशीखंड या ग्रंथात उल्लेख आहे. अशा या स्वयंभू विश्वनाथाचे दर्शन घेतल्याने मुक्ती मिळते व त्यामुळे येथे प्रतिवर्षी लाखो भक्तजन विश्वनाथाचे दर्शन घेऊन मनशांती मिळवतात. श्रावण मासात व महाशिवरात्री दर्शनार्थ येणाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते.

गंगा नदीचं महत्त्व

वरुणा आणि असी या दोन उपनद्यांचे गंगेशी जिथे मिलन होते त्या दोन मिलनस्थानांमधील रुंद विशाल पात्रातून संथपने वळण घेत जाणारी उत्तरवाहिनी गंगा आणि तिच्या पश्चिम तटावरील सुरम्य घाट हे भारताच्या सर्व भागातून येणाऱ्या श्रद्धाळू यात्रेकरूंचेच नव्हे तर जगातील सर्व देशातून येणाऱ्या पर्यटकांचेही आकर्षण केन्द्र आहे.

काशी अथवा वाराणसीचा विचार येताच कोणत्याही भारतीयाला गंगेचे स्मरण झाल्याशिवाय राहातच नाही. . काशीला येऊन गंगेत स्नान किंबहुना कमीत कमी पवित्र गंगाजलाचे दोनचार थेंब आपल्या अंगावर उडवून कृतकृत्य झालेल्या भावनेने यात्रेकरु वा पर्यटक परततो, मग तो श्रद्धावान वा कितीही अश्रद्ध असो.

भारतामधील जेवढ्या नद्या आहेत त्या सर्व नद्यांमध्ये गंगेला एक विशिष्ट स्थान आहे, मान आहे. गंगेचा उगम भगवान शिवशंकराच्या जटांमध्ये झाला असून तेथून ती हजारों मैल वाहत जाते व श्री विष्णूच्या चरणाजवळ पोहचते. याचाच अर्थ असा की गंगा निर्माण होते देवापासून व विलीन होते देवाजवळ. अशी ही गंगा कोटि कोटि प्राणिमात्रांना जगवीत-जीवन देत आहे. अशी ही गंगा भारतवर्षामध्ये सर्वात पवित्र मानली जाते. अनेक तीर्थक्षेत्रे हिच्या कांठी वसली आहेत. श्री क्षेत्र काशी हे त्यापैकी एक व सर्वप्रथम आणि सर्वमान्य तीर्थक्षेत्र होय. गंगा व काशी यांचे नाते अतूट आहे. सुमारे दीड हजार मैल लांबीच्या गंगेला सर्वत्र सारखेच पवित्र मानले जाते. काशीतील गंगाजल किती पवित्र आहे हे सांगायची आवश्यकता नाहीं.

काशी आणि गंगा यांचं अतूट नातं आहे. गंगेच्या पवित्र पाण्यात स्नान केल्याने पाप नष्ट होतात, अशी श्रद्धा आहे. अनेक धार्मिक विधी आणि अंतिम संस्कार गंगेच्या किनारी केले जातात. काशीतील घाट हे गंगेची पूजा करण्यासाठी आणि मृत आत्म्यांच्या मुक्तीसाठी ओळखले जातात.

दशाश्वमेध घाट

दशाश्वमेध घाट हा काशीतील सर्वात प्रसिद्ध घाट आहे. इथे रोज संध्याकाळी गंगेची आरती होते, जी एक अद्वितीय आणि सुंदर सोहळा असतो. अनेक भक्त आरतीच्या वेळी उपस्थित असतात आणि हा क्षण त्यांच्यासाठी एक खास आध्यात्मिक अनुभव ठरतो.

काशीतील इतर महत्त्वाची मंदिरे

काशीत अनेक मंदिरे आहेत ज्यांचं धार्मिक महत्त्व आहे. खाली काही प्रमुख मंदिरांची माहिती दिली आहे:

संकट मोचन हनुमान मंदिर

संकटें दूर करणारा हनुमान म्हणजे “संकटमोचन हनुमान“. या मूर्तीची स्थापना गोस्वामी तुलसीदासजी यांनी केली. येथील हनुमानाची मूर्ती भव्य असून मंदिर व परिसर सुंदर आहे. हनुमान हे जागृत दैवत आहे. हे मंदिर भगवान हनुमान यांना समर्पित आहे. भक्तांच्या संकटातून मुक्त होण्यासाठी हे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. इथे अनेक लोक आपल्या संकटांवर मात करण्यासाठी प्रार्थना करतात. मंदिर प्रांगणात श्री हनुमंताच्या मूर्तीच्या ठीक समोर श्री राममंदिर पण आहे.

दुर्गा मंदिर

हे मंदिर देवी दुर्गेला समर्पित आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे याचा लाल रंग आणि खास स्थापत्य. लोक इथे देवी दुर्गेची पूजा करण्यासाठी येतात. श्री दुर्गादेवी म्हणजे शक्तीचे प्रतीक होय. अठराव्या शतकात बांधलेले हे मंदिर भव्य व आकर्षक आहे. अनेक लहान लहान शिखरांनी मिळून या मंदिराचे शिखर बनले आहे. मंदिरात माकडे खूप असतात म्हणून याला “मंकी टेम्पल” असेही म्हणतात. मंदिराला लागून तळे आहे. या तळ्याला “दुर्गाकुंड” म्हणतात. या मंदिरात नवरात्रात गर्दी असते.

कवडादेवी

कवडा माता ही काशी विश्वनाथांची बहिण आहे असं म्हणतात. ही फार सोवळी असल्याने काशी विश्वनाथांनी तिला राहाण्यासाठी लांबचे ठिकाण दिले. पण इतक्या लांब राहिल्याने आपल्या दर्शनास कोणीही येणार नाहीं अशी खंत तिने काशी विश्वनाथांकडे “व्यक्त केल्यावर त्यांनी प्रसन्न होऊन तिला वर दिला की, “तुझे दर्शन घेतल्याशिवाय काशी-यात्रा करणाऱ्यांची यात्रा सफल होणार नाही.” म्हणून तिचे दर्शन घेतल्याशिवाय काशी-यात्रा पूर्ण होत नाही. या देवी ला कवडी वाहतात म्हणून हिला कवडीमाता म्हणतात. कवड्या या मंदिराजवळ मिळतात. हे मंदिर दुर्गामंदिरा समोर आहे. ह्या मंदिराजवळ कोणते ही वाहन जात नाहीं.

श्री अन्नपूर्णा मंदिर

अन्नपूर्णा देवीचे हे मंदिर श्री काशी विश्वेश्वरांच्या मंदिराजवळ दक्षिणेकडे सुमारे 70 मीटर अंतरावर आहे. काशीचा अधीश्वर भगवान शंकर आहे तर अधीश्वरी भगवती अन्नपूर्णा आहे. अन्नपूर्णा हे दुर्गेचेच रूप आहे. या मंदिरात अन्नपूर्णा देवीची संपूर्ण सोन्याची मूर्ती आहे. ती पहिल्या मजल्यावर असते. या सुवर्णमय अन्नपूर्णा देवीचे दर्शन सर्वसामान्य दर्शनार्थीना दिवाळीनंतर जो अन्नकूट होतो त्या तीन दिवसांमध्येच फक्त घडते. या देवीची पूजा वैदिक विधीनुसार सात्त्विक पद्धतीने होते. तामसी पद्धतीची पूजा येथे होत नाही. दिवाळीनंतर तीन दिवस अन्नकूट असतो. श्रद्धाळू लोकांची श्रद्धा अशी की अन्नपूर्णा देवीच सर्वांना भोजन पुरविते म्हणून काशीक्षेत्री कोणी उपाशी राहात नाही. खुद्द भगवान शंकराने सुद्धा माता अन्नपूर्णजवळ भिक्षा याचना केली होती.

कालभैरव मंदिर

काशीवासी कालभैरवाला काशीचा कोतवाल-संरक्षणकर्ता मानतात. कालभैरव काशीच्या रहिवाश्यांचे रोगराई, आजारपण, भय यापासून रक्षण करतो. मृत्यू व काल यांना नियंत्रणात ठेवणारी शक्ती म्हणजे कालभैरव होय. कालभैरवाचा सोटा प्रसिद्ध आहे. या मंदिरामध्ये काळे गंडे मिळतात. ते काळे गंडे म्हणजे कालभैरवाचे प्रसाद-चिन्ह मानले जाते. काशीक्षेत्रामध्ये यमराजाचे शासन न चालता कालभैरवाचे शासन चालते. कालभैरव लोकांचा रक्षणकर्ता आहे, यांच्या दर्शनाने सर्व दुःखे दूर होतात अशी पण भक्तांची श्रद्धा आहे.

काशीत यात्रा कधी करावी?

काशीत वर्षभर जाऊ शकतो, पण ऑक्टोबर ते मार्च हा काळ खास योग्य आहे. या काळात हवामान उत्तम असतं आणि तुम्ही मंदिरं आणि घाट आरामात पाहू शकता.

प्रवास कसा करावा?

काशीला पोहोचण्यासाठी रेल्वे आणि विमानसेवा उपलब्ध आहे. वाराणसीचं रेल्वे स्थानक आणि हवाईतळ दोन्ही सुविधा असलेलं मोठं केंद्र आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न १: काशीचं धार्मिक महत्त्व काय आहे?
उत्तर: काशी ही भगवान शिवाची नगरी आहे आणि इथे मरणं म्हणजे मोक्ष मिळणं, अशी श्रद्धा आहे.

प्रश्न २: काशीतील प्रसिद्ध मंदिरे कोणती आहेत?
उत्तर: काशी विश्वनाथ मंदिर, संकट मोचन हनुमान मंदिर आणि दुर्गा मंदिर ही काही प्रमुख मंदिरे आहेत.

प्रश्न ३: गंगा नदीचं महत्त्व काय आहे?
उत्तर: गंगा नदीच्या पाण्यात स्नान केल्याने पाप नष्ट होतात असं मानलं जातं. घाटांवर अनेक धार्मिक विधी होतात.

प्रश्न ४: काशीला जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती आहे?
उत्तर: ऑक्टोबर ते मार्च हा काळ काशीला भेट देण्यासाठी सर्वोत्तम आहे कारण या काळात हवामान आल्हाददायक असतं.

निष्कर्ष:
काशी ही एक पवित्र नगरी आहे जिथे धार्मिकता आणि आध्यात्मिकता यांचा अनुभव मिळतो. इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक वेगळं समाधान आणि शांती मिळते.

By vsadmin