वटपौर्णिमा किंवा वट सावित्री पूर्णिमा व्रत

आपला हिंदू संस्कृतीमध्ये बरेच सण साजरे केले जातात त्यातील एक म्हणजे वटसावित्री पौर्णिमा. आपला संस्कृतीमध्ये अखंड सौभाग्यवती राहण्यासाठी बरेच व्रतवैकल्य केले जातात त्यातील एक म्हणजे वटसावित्री पौर्णिमा हे आहे. वटपौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमा किंवा वट सावित्री पौर्णिमा असेही म्हणतात.

ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच भागात अजूनही सावित्रीव्रत सौभाग्यवती स्त्रीया करतात. सावित्री ही एक पतीव्रता स्त्री होती. तिने आपल्या पतीचे प्राण परत मिळविण्याकरता यमाला आपल्या भक्तीने प्रसन्न केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळविले आणि तिची स्मृती आठवण सर्व भारतीय स्त्रियांनी दीर्घकाळापासुन जागृत ठेवली आहे. सावित्रीचे चरित्र लोकप्रिय असून त्याचे अनेक ग्रंथात वर्णन केले आहे.

वट सावित्री व्रत (वट पौर्णिमा) चे महत्व

सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळविण्याकरिता यम राजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळविले. ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड वडाचे होते. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली. या प्रसंगाची आठवण म्हणून आजही स्त्रिया वडाची पूजा करतात.

वड हे देवतुल्य असे झाड आहे. वड ही अतिशय बहुगुणी औषधी वनस्पती आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार, वट (वट) वृक्ष “त्रिमूर्ती” किंवा भगवान शिव, भगवान ब्रह्मा आणि भगवान श्री कृष्ण यांचे प्रतिनिधित्व करते. जे लोक वटवृक्षाची पूजा करतात ते भाग्यवान मानले जातात. स्कंद पुराण, भविष्योत्तर पुराण, महाभारत इत्यादी असंख्य ग्रंथ आणि पुराणांमध्ये व्रताचे महत्त्व सांगितले आहे.

वटपौर्णिमा पूजेचे साहित्य

दोन हिरव्या बांगड्या, शेंदुर, अत्तर, कापूर, पंचामृत, पूजेचे वस्त्र, विड्याची पाने, सुपारी, पैसे, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दुर्वा, गहु इ. वडाच्या झाडाला सात वेळा दोरा बांधावा. सुत कापसाचे काढलेले असावे. प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी. त्याची हळदकुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी. वटपौर्णिमेची आरती म्हणावी. स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा. पूजा झाल्यावर वडाच्या दर्शनास जावे. हळद कुंकू वाहून, आंबे पैसे वडापुढे ठेऊन नमस्कार करावा. वडाला सात प्रदक्षिणा घालाव्यात. पाच सुवासिनींची आंब्यानी व गव्हानी ओटी भरावी.

2024 मध्ये वट सावित्री पौर्णिमा कधी आहे?

ज्येष्ठ अमावस्या 06 जून 2024 रोजी साजरी करण्यात आली; वट पौर्णिमा व्रत २१ जून रोजी साजरी होणार आहे.

वट पौर्णिमा व्रत कथा

सावित्रीने सत्यवानाबरोबर विवाह केला. सत्यवानाला १ वर्षाच्या अंती मृत्यु येणार आहे, असे नारद मुनींनी तिला सांगितले होते. नारदाने सांगितलेल्या दिवसाच्या पूर्व तीन दिन तिने उपवास सुरू केले. तो लाकडे, फुले, फळे आणण्याकरिता अरण्यात गेला असता. साथिक त्याच्या बरोबर गेली. ते वनातील शोभा पहात पहात चालले होते, पण सावित्रीचे मन मात्र जागेवा नव्हते. सत्यवानाने सर्व फळे गोळा केली, वाळलेली लाकडे तोडण्यासाठी तो झाडावर चढला नंतर त्याला चक्कर यायला लागली व तो घाबरला, डोळ्यापुढे अंधार वाढू लागला. सावित्री पतीला म्हणाली नाथ आपण थोडा वेळ विश्रांती घ्या म्हणजे आपणास बरे वाटेल. सत्यवान सावित्रीच्या मांडीवर डोके ठेऊन निजला.

इतक्यात तिला समोरून एक दिव्य पुरूष येतांना दिसला. क्षणात त्याने आपले मृत्युपाश सत्यवानाचे प्राण हरणकरण्याकरिता टाकले. हे पाहुन सावित्रीने त्या दिव्यपरुषाचे चरणावर मस्तक ठेवले, त्या दिव्यपुरूषाला नमस्कार केला व तीने विचारले की तुम्ही कोण आहात. तेव्हा तो पुरूष म्हणाला मी प्राणहरण करणारा यमराज आहे, हे ऐकून सावित्री त्याच्या पाठोपाठ जाऊ लागली.

ते पाहून यमराज म्हणाले,“सावित्री, तू पतिव्रता आहेस, तू धार्मिक आहेस, तुझ्या पतीसेवेवर मी प्रसन्न आहे. तेव्हा जो पाहिजे तो वर माग!” तेव्हा तीने आपल्या पतीचे प्राण परत यावे असा वर मागितला व चमत्कार झाला व सत्यवान पुन्हा जीवंत झाला. सावित्रीची पतीवर किती निष्ठा आहे याची ही परीक्षा होती. यावरून सावित्रीने पतीनिष्ठा व पतिव्रता या गुणांनी प्रत्यक्ष यमराजाला हरवले. अशी ही कथा आहे. महान पतिव्रता सावित्रीने साक्षात यमधर्माशी सामना करून आपल्या पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती करून दिली. या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सावित्रीची प्रार्थना करावी व वडाचे झाडास सूत गुंडाळून षोडषोपचारे पूजा करावी. सायंकाळी सुवासिनींसह सावित्रीच्या कथेचे सामुदायिक वाचन करावे.

सावित्री ब्रम्ह वादिनी सर्वदा प्रिय भाषिणी ।
तेन सत्येनमां पाहि दुःखसंसार सागरात ||
अवियोगी यथा देव सावित्र्या सहितस्य ते ।
अवियोग तथास्माकं भूयात जन्म जन्मनि ॥




By vsadmin