प्रत्येक महिन्यात एक शिवरात्र असते. फेब्रुवारी मध्ये म्हणजेच माघ महिन्यात जी शिवरात्र येते तिला महाशिवरात्र असे म्हणतात.पण माघ कृ. पक्षातील शिवरात्र महत्वाची मानली जाते. हा दिवस भगवान शंकराच्या उपासनेचा असतो. या दिवशी उपवास करतात. शंकराला अभिषेक लघुरूद्र, महारूद्र करतात, बेलाची पाने भक्तीभावाने वाहतात. महाशिवरात्रीचे महात्म्य सांगणारी एक कथा आहे.

महाशिवरात्री म्हणजे काय?

महाशिवरात्री हिंदू कॅलेंडर मधला सर्वात महत्त्वाचा सण आहे. महाशिवरात्री हा भगवान शिव आणि देवी शक्ती यांच्या पवित्र विवाहाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. हा सण माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चौदाव्या दिवशी, रात्री साजरा केला जातो. या दिवशी भक्त भगवान शिवाची भक्तिभावाने प्रार्थना, उपवास आणि ध्यान करतात. यामुळे त्यांना शक्ती, ज्ञान आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी भगवान शिवाचा आशीर्वाद मिळतो, असा विश्वास आहे.

महाशिवरात्रीचे महत्त्व

महाशिवरात्री हा भगवान शिवाची उपासना करण्याचा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. भगवान शिव हे संरक्षण, शांती आणि आध्यात्मिक प्रगतीचे प्रतीक मानले जातात. या दिवशी भक्त मन:पूर्वक व्रत पाळतात आणि अनुष्ठान करतात. यामुळे आत्मा शुद्ध होतो आणि दिव्य आशीर्वाद प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे.

महाशिवरात्री 2025 कधी आहे?

महाशिवरात्री 2025 मध्ये 26 फेब्रुवारी, बुधवार रोजी आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्त उपवास ध्यान आणि पूजा करतात. या दिवशीच्या शिव पूजेला विशेष महत्त्व असते.

महाशिवरात्रीची कथा

एकदा एक शिकारी शिकारीसाठी रानात गेला. त्या दिवशी महाशिवरात्र होती. जाता जाता त्याला एक शिवमंदिर लागले. देवळात काही लोक शंकराची पूजा करीत होते. काही’ नमः शिवाय’ असा जप करीत होते ते पाहुन तो हसला त्यांची चेष्टा करावी म्हणून तो ‘शिव शिव‘ असे म्हणू लागला. त्यामुळे त्याच्याकडुन नकळत शिवोपासना घडु लागली, तो रानात
आला. एका तळ्याकाठी असणाऱ्या बेलाच्या झाडावर तो शिकारीसाठी बसला त्याच्या डोळ्यांसमोर पानांचे झुबके येऊ लागले. त्यामुळे त्याला सावज निट दिसत नव्हते म्हणून त्याने ती पाने तोडून खाली टाकायला सुरूवात केली. योगायोगाने त्या झाडाखाली शंकराची पिंड होती, त्यावर बेलाच्या पानांचा अभिषेक सुरू होता. व्याधाच्या हातून नकळत शिवोपासना घडत होती. तेवढ्यात हळू हळू हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्यासाठी आला. व्याधाने आपला तिरकामठा सज्ज करून एका हरीणीवर नेम धरला.

हरिणीला चाहुल लागली, ती सावध झाली आणि कळवळून व्याधाला म्हणाली, “हे व्याधा, थोडा थांब मला आत्ताच मारू नकोस, माझी मुले-बाळे वाट पाहत असतील, मला त्यांना भेटू दे, मी पुन्हा येते, मग तू मला खुशाल मार!”हरिणीचे हे शब्द ऐकून व्याध जोराने हसला अणि म्हणाला. वा..! काय पण सांगत आहे, म्हणे मी परत येईन. हातात आलेले शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही माझी पोर बाळ उपाशी ठेवून तुला सोडून देऊ, अन तुझ्यावर विश्वास ठेवू!

“व्याधा, मी खरंच सांगते माझ्यावर विश्वास ठेव. तुला तुझ्या मुलांबद्दल प्रेम वाटते तसे मला नाही का वाटत? मरण्यापूर्वी निदान त्यांना एकदा बघून येऊ दे!” हरिणी पुन्हा कळवळुन म्हणाली. ते ऐकुन व्याधाला तिची दया आली त्याने तिला परवानगी दिली. शिकारी झाडावरच तिची वाट पाहत बसला. रात्रभर खायला काहीच न मिळाल्याने त्याला उपवास पडला. वेळ जायला काहीतरी उद्योग हवा म्हणुन तो बेलाची पाने तोडून खाली टाकत होता व ती शिवलिंगावर पडत होती. दुसऱ्या दिवशी ती हरिणी आपल्या परिवारासह तेथे परत आली. ते पाहून व्याधाला आश्चर्य वाटले. रात्रभर घडलेल्या उपवासाने त्याचे मन विचार करू लागले. त्यामुळे हरिणीच्या प्रामाणिकपणाचे त्याला कौतुक वाटले. त्याच्या मनात चांगल्या भावना निर्माण होऊ लागल्या, प्रकाश आल्यावर अंधार जसा नाहिसा होतो त्याप्रमाणे शुध्द चांगल्या भावनांच्या निर्मितीमुळे तिची हत्या करण्याचा विचार नाहीसा झाला.

हे मनाचे शिव म्हणजेच कल्याणकारी विचार प्रगट होतांच, भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले. व्याधाला व हरिणीच्या परिवाराला त्यांनी विमानात बसवून स्वर्गात नेले. रात्रीच्या वेळी आकाशात हे मृग नक्षत्र दिसते त्याच्या शेजारी व्याधाची एक तेजस्वी चांदणीही लुकलुकत असते. त्याचे तेज मोठे मनमोहक आहे. अशी ही कथा आहे.

By vsadmin